वा रे पठ्ठ्या, शाळेसाठी आणला लाखोंचा निधी...

KADus
KADus

कडूस (पुणे) : तरुणाईने मनावर घेतले तर आपल्या गावासाठी काहीही करू शकते, याचा प्रत्यय खेड तालुक्यातील कडूस येथील योगेश धायबर या तरुणाने दिला आहे. शिक्षण घेतलेल्या आपल्या शाळेच्या विकासासाठी नोकरीला असलेल्या कंपनीकडून त्याने चौदा लाख रुपये मिळवून दिले आहेत. त्याच्या या योगदानाचे परिसरातून कौतुक होत आहे.

टाटा टेक्नॉलॉजीस कंपनीने सामाजिक दायित्व निधीतून व पुणे नॉर्थ रोटरी क्लबने हॅप्पी स्कूल उपक्रमांतर्गत कडूस येथील रामभाऊ म्हाळगी विद्यालयासाठी चौदा लाख रुपये दिले आहे. हा निधी मिळवण्यासाठी गावचे रहिवासी व रामभाऊ म्हाळगी विद्यालयाचे माजी विद्यार्थी तसेच टाटा टेक्नॉलॉजीस कंपनीचे अधिकारी योगेश धायबर यांनी परिश्रम घेतले. याकामी सनदी लेखाकार (सीए) किसन गारगोटे यांची मोलाची साथ मिळाली. 

या निधीतून शाळेच्या पहिल्या मजल्याचे बांधकाम, प्रयोगशाळा व सुसज्ज ग्रंथालयाचे काम करण्यात येणार आहे. या कामाचा प्रारंभ बुधवारी (ता. 17) ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कालेकर व शाळेचे मुख्याध्यापक संजय शिंदे यांच्या हस्ते झाला. या वेळी रोटरी क्लबचे मुकुंद महाशब्दे, चारुदत्त भावे, राम ढमाले, योगेश धायबर, रामदास रेटवडे व शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते. 

योगेश हा कडूस येथील उच्चशिक्षित तरुण आहे. त्याचे दहावीपर्यंतचे शिक्षण रामभाऊ म्हाळगी विद्यालयात झाले आहे. शाळेच्या इमारतीची दुर्दशा पाहून शाळेसाठी काहीतरी करायची इच्छा त्याच्या मनात होती. यासाठी त्याने परिश्रम घेतले व शाळेसाठी चौदा लाखाचा निधी काम करत असलेल्या कंपनीकडून मिळवला. एवढा मोठा निधी शाळेच्या माजी विद्यार्थ्याने मिळवून दिल्याबद्दल शिक्षकांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे. ग्रामस्थ त्याच्या या कार्याचे कौतुक करीत आहेत. 

याबाबत योगेश म्हणाला, 'ज्या शाळेत शिकलो, त्या शाळेसाठी मदत करण्याची इच्छा होती. शिक्षणामुळे चांगल्या कंपनीत नोकरीला लागलो. ज्या कंपनीत नोकरी करतो, त्या कंपनीच्या सीएसआर फंडातून शिक्षण घेतलेल्या शाळेसाठी चौदा लाखाचा निधी मिळवता आला. ज्या ठिकाणी दुनियादारी शिकलो, त्या शाळेसाठी काही तरी करता आले, याचे समाधान मिळाले. ही भावना शब्दात व्यक्त करणे कठीण आहे.' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com