जेवण न दिल्याच्या रागातुन तरुणांकडून हॉटेल मालकासह कामगारांवार जीवघेणा हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Attack

हॉटेल बंद झाल्यानंतर फुकट जेवण देण्याची मागणी करणाऱ्यांना नकार दिल्याच्या रागातुन तिघांनी हॉटेल मालकासह कामगारांवर धारदार शस्त्रांनी वार करीत जीवघेणा हल्ला केला.

जेवण न दिल्याच्या रागातुन तरुणांकडून हॉटेल मालकासह कामगारांवार जीवघेणा हल्ला

पुणे - हॉटेल बंद झाल्यानंतर फुकट जेवण देण्याची मागणी करणाऱ्यांना नकार दिल्याच्या रागातुन तिघांनी हॉटेल मालकासह कामगारांवर धारदार शस्त्रांनी वार करीत जीवघेणा हल्ला केला. हि घटना रविवारी मध्यरात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमारास वारजे माळवाडी येथील महामार्गालगतच्या परिसरात घडली.

मंगेश विजय जडीतकर (वय 23, रा.पाटीलनगर, शिवणे), सौरभ प्रकाश मोकर (वय 22, रा. उत्तमनगर), शुभम अनिल सुद्देवार (वय 25, रा. वारजे) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी चंद्रकांत वरवटे (वय 46, रा. यशोदीप चौक, वारजे) यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वरवटे यांचे वारजे परिसरात "साई सरीता' नावाचे हॉटले आहे. दररोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास ते हॉटेल बंद करतात. नेहमीप्रमाणे त्यांनी रविवारी बारा वाजता हॉटेल बंद केल्यानंतर कामगार हॉटेलमधील उर्वरीत कामे करीत होते. त्यावेळी जडीतकर, मोकर व सुद्देवार तेथे आले. त्यांनी फिर्यादीचे भाऊ एकनाथ यांच्याकडे फुकट जेवण देण्याची मागणी केली.

मात्र हॉटेल बंद झाल्यामुळे त्यांनी आरोपींना जेवण देण्यास नकार दिला. त्याचा राग आल्याने तिघांनी एकनाथ यांच्यासह हॉटेलमधील कामगार नदीम खान, समाधान ओव्हाळ, विकास झुंजार यांच्यावर धारधार शस्त्राने वार केला. या घटनेत सर्वजण जखमी झाले. तसेच संशयित आरोपींनी हॉटेलमधील साहित्याची तोडफोड हि केली. त्यानंतर त्यानंतर त्यांनी हॉटेलच्या गल्ल्यातील साडे तीन हजार रुपायांची रोकड काढून घेऊन हातातील कोयता हवेत फिरवून "आम्हाला जेवण न दिल्यास असेच हाल करेल' अशी धमकी देऊन तेथून पळ काढला. या घटनेप्रकरणी फिर्याद दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी.एस. हाके यांच्या मार्गर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे, बागल यांच्या पथकाने तिघा आरोपींना अटक केली.