आदित्य ठाकरेंचे एका दगडात दोन पक्षी

उत्तम कुटे
गुरुवार, 25 एप्रिल 2019

मुंबईतील नाईटलाईफचे 'लॉलीपॉप' आदित्य यांनी येथील तरुणाईला दाखविले. लोणावळ्यासह पर्यटनस्थळी ते सुरु करण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या लाईफची संपूर्ण महाराष्ट्रात आवश्यकता असून त्यामुळे रोजगारात दुपट्टीने वाढ होईल. तसेच महापालिकांचे उत्पन्नही वाढेल, असे ते म्हणाले. 

पिंपरी : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये बुधवारी रात्री आदित्य संवाद या अराजकीय कार्यक्रमाव्दारे तरुणाईशी संवाद साधून राजकीय हेतू साध्य करून घेतला. मावळ, शिरुरच्या मतदानाला पाच दिवस उरले असताना तरुणांची मते शिवसेनेकडे खेचण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तसेच या दोन्ही जागांचा निकाल फिरविण्याची ताकद असलेल्या शहरातील दोन्ही भाजप आमदारांशी नंतर त्यांनी चर्चा करून प्रचाराचा आढावाही घेतला. अशा रीतीने त्यांनी एका दगडात दोन लक्ष्य त्यांनी साधले.

मुंबईतील नाईटलाईफचे 'लॉलीपॉप' आदित्य यांनी येथील तरुणाईला दाखविले. लोणावळ्यासह पर्यटनस्थळी ते सुरु करण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या लाईफची संपूर्ण महाराष्ट्रात आवश्यकता असून त्यामुळे रोजगारात दुपट्टीने वाढ होईल. तसेच महापालिकांचे उत्पन्नही वाढेल, असे ते म्हणाले. 

आदित्य संवाद हे बिगर राजकीय व्यासपीठ असून त्यात तरुणाईच्या प्रश्नांवर या कार्यक्रमात चर्चा होणार असल्याचे संयोजकांनी स्पष्ट केले होते. मात्र, ती राजकीयच झाली. तरुणाईचे प्रश्न बाजूलाच राहिले आणि चर्चा झाली शहरातील शास्तीकराचा प्रश्न, नाईटलाईफ आणि बैलगाडा शर्यतबंदीवरच. परिणामी निवडणूक प्रचार सभेचे स्वरुप या संवादाला  आले. तरुणाईचा मोठा प्रतिसाद त्याला मिळाला. त्याचा लाभ घेत मावळमधून श्रीरंग बारणे यांना पुन्हा संसदेत पाठवा, असे आवाहन 'ज्युनिअर ठाकरें'नी केले. मात्र, भविष्यात मनसेबरोबर युती होण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. दोन दिवसांपूर्वीच त्यांचे काका व मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भविष्यात काहीही घडू शकते,असे सूचक विधान शिवसेनेबरोबरील युतीवर एका मुलाखतीत केले होते. 

ठाकरे म्हणाले, ''शिवसेना-भाजपची युती देशहित आणि हिंदुत्वामुळे झाली आहे. एकीकडे देशहित, देशाची सुरक्षा पाहणारी महायुती तर दुसरीकडे देशद्रोहाचे कलम काढून टाकू असे म्हणणा-यांचे महागठबंधन आहे.  महागठबंधनच्या नेत्यांकडून देश तोडण्याची भाषा केली जाते. त्यांना दोन पंतप्रधान हवे आहेत. त्यामुळे कोणाला निवडून द्यायचे याचा सर्वांनी विचार करावा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षात पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यामुळे मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे.'' 

संवाद झाल्यानंतर रात्री आदित्य यांनी शहराचे कारभारी भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्याशी प्रचारावर चर्चा केली. यावेळी शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे, भाजपचे शहर सरचिटणीस सारंग कामतेकर हे सुद्धा उपस्थित होते. तत्पूर्वी आदित्य यांचे स्वागत दोन्ही आमदारांनी पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन केले.

Web Title: Yuvasena chief Aditya Thackeray rally in Pimpri