esakal | झेडपी सदस्य हाजीर हो....! ; सदस्यांना पुकारण्याची अधिकाऱ्यांवर वेळ
sakal

बोलून बातमी शोधा

झेडपी सदस्य हाजीर हो....! ; सदस्यांना पुकारण्याची अधिकाऱ्यांवर वेळ

झेडपी सदस्य हाजीर हो....! ; सदस्यांना पुकारण्याची अधिकाऱ्यांवर वेळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील घटकपक्ष असलेल्या आणि पुणे जिल्हा परिषदेत सत्ताधारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला शह देण्यासाठी चक्क विरोधी पक्षाच्या सदस्यांनीच जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती बैठकीचा ताबा घेण्याचा प्रकार सोमवारी (ता.११) जिल्हा परिषद मुख्यालयात झाला. विरोधकांच्या या भूमिकेने प्रशासनातील अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली आणि त्यातूनच या अधिकाऱ्यांवर चक्क जिल्हा परिषदेच्या सभागृहाच्या बाहेर येऊन जिल्हा परिषद सदस्य हाजीर हो म्हणत सदस्यांना तीनवेळा पुकारण्याची वेळ आली. या नाट्यमय घडामोडींसाठी तो सोमवारचा महाराष्ट्र बंद कारणीभूत ठरला आहे.

पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार आज (ता.११) जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी स्थायी समितीची सभा बोलाविली होती. यासाठीची कार्यक्रमपत्रिका सर्व सदस्यांना आधीच पाठविण्यात आली होती. दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली. यामुळे जिल्हा परिषद सदस्यांना स्थायी समितीच्या सभेला हजर राहता येणार नाही, असे गृहित धरून या बैठकीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच रविवारी सायंकाळी ही सभा पुढे ढकलण्याचा निर्णय जिल्हा परिषद अध्यक्षांनी घेतला होता. तरीही याकडे दुर्लक्ष करत, ज्येष्ठ सदस्या आशा बुचके आणि भाजपचे जिल्हा परिषदेतील गटनेते शरद बुट्टे पाटील हे सभेसाठी उपस्थित झाले. पंचायतराज कायद्यातील तरतुदीनुसार सभा सुरु होण्यापूर्वी ही तहकूब करता येत नाही. त्यामुळे उपस्थित सदस्यांपैकी एका सदस्याची सभेच्या अध्यक्षस्थानी निवड करता येते, हे शरद बुट्टे पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

त्यानंतर सभेच्या अध्यक्षस्थानी आशा बुचके यांची निवड करून, त्यांनी सभा सुरु झाल्याची घोषणा केली. त्यामुळे जिल्हा परिषदेत नव्यानेच रुजू झालेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर सभागृहाबाहेर येऊन, जिल्हा परिषद सदस्य हाजीर हो, म्हणून पुकारण्याची वेळ आली. शिवाय विरोधकांनी सुरू केलेल्या सभेला अधिकाऱ्यांना हजेरीही लावावी लागली. त्यानंतर बुचके यांनी गणपूर्तीअभावी ही सभा तहकूब केल्याची घोषणा केली. या नाट्यमय घडामोडी समजल्यानंतर उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी सभागृहाकडे धाव घेतली.

loading image
go to top