गोळ्या-औषधप्रकरणी कारवाई केव्हा? झेडपी सदस्यांचा प्रशासनाला सवाल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

कालबाह्य औषधांचा सुमारे एक कोटी रुपयांचा लपवून ठेवलेला साठा पकडून देऊनही अद्यापही दोषींवर कारवाई का केली नाही, असा संतप्त सवाल सर्वपक्षीय जिल्हा परिषद सदस्यांनी बुधवारी (ता.6) झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत केला.

पुणे -  कालबाह्य औषधांचा सुमारे एक कोटी रुपयांचा लपवून ठेवलेला साठा पकडून देऊनही अद्यापही दोषींवर कारवाई का केली नाही, असा संतप्त सवाल सर्वपक्षीय जिल्हा परिषद सदस्यांनी बुधवारी (ता.6) झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत केला. या कारवाईबाबत होत असलेल्या विलंबाबाबत सदस्यांनी या सभेत जाबही विचारला. शिवाय या कारवाईसाठी आता एका महिन्याची डेडलाईन देण्यात आली. यासाठीचा ठराव स्थायीच्या सभेत मंजूर करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना गोळ्या-औषधांचा पुरवठा करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त होणाऱ्या निधीतून सुमारे एक कोटी रुपयांच्या गोळ्या-औषधांची खरेदी करण्यात आली होती. ही खरेदी सन 2015-16 या आर्थिक वर्षातील आहे. मात्र या गोळ्या आणि औषधांचा प्रत्यक्षात प्राथमिक आरोग्य केंद्रांना पुरवठा करण्यात आलेला नव्हता. जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी तीन महिन्यांपूर्वी या कालबाह्य गोळ्या-औषधांचा आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लपवून ठेवलेला साठाही उघडकीस आणला होता आणि त्याबाबत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणीही सर्वसाधारण सभेत केली होती.

या मागणीनुसार जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते यांनी त्रिसदस्यीय चौकशी समिती नियुक्त करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव यांना दिला होता. त्यानुसार या चौकशी समितीने सखोल चौकशी करून, त्याचा अहवालही तयार केला आहे. दरम्यान, या समितीच्या चौकशीत या कालबाह्य गोळ्या-औषधांच्या खरेदीत गोलमाल झाल्याचे उघडकीस आले आहे. तरीही संबंधित दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जात नाही. त्यांना कशासाठी पाठीशी घातले जात आहे, याचे स्पष्टीकरण देण्याची मागणी बुट्टे पाटील यांनी आजच्या स्थायी समितीच्या सभेत केली. त्यांच्या मागणीला ज्येष्ठ सदस्या आशा बुचके आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदस्य रणजित शिवतरे यांनीही पाठिंबा दिला आणि वेळ मारून नेण्यापेक्षा प्रत्यक्षात कारवाई केव्हा करणार आहात, याबाबतची विचारणा जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली. जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते यांनी याप्रकरणी येत्या महिनाभरात कारवाई करण्याचे आश्‍वासन सदस्यांना दिले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ZP members ask the administration When to take pill-drug action