esakal | गुरुजींना ‘हेल्थ कार्ड’ द्यावे - सुळे
sakal

बोलून बातमी शोधा

zp -teacher

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांनी अन्य कामांत व्यग्र न राहता सर्वांनी हाडांचे शिक्षक बनावे, असा सल्ला बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी (ता. ४) दिला. यासाठी प्रत्येक शिक्षकाचे आरोग्य चांगले पाहिजे, त्यामुळे गुरुजींना ‘हेल्थ कार्ड’ द्यावे, अशी सूचनाही त्यांनी जिल्हा परिषदेला केली. 

गुरुजींना ‘हेल्थ कार्ड’ द्यावे - सुळे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांनी अन्य कामांत व्यग्र न राहता सर्वांनी हाडांचे शिक्षक बनावे, असा सल्ला बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी (ता. ४) दिला. यासाठी प्रत्येक शिक्षकाचे आरोग्य चांगले पाहिजे, त्यामुळे गुरुजींना ‘हेल्थ कार्ड’ द्यावे, अशी सूचनाही त्यांनी जिल्हा परिषदेला केली. 

पुणे जिल्ह्यातील २९ शिक्षकांना सुळे यांच्या हस्ते जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले, त्या वेळी शिक्षकांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, बांधकाम सभापती प्रवीण माने, कृषी सभापती सुजाता पवार, महिला व बालकल्याण सभापती राणी शेळके, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुनील कुऱ्हाडे, डॉ. गणपत मोरे (माध्यमिक), हारून आतार (निरंतर शिक्षण) आदी उपस्थित होते.  

सुळे म्हणाल्या, ‘‘लहान वयात मुलांवर तंत्रज्ञानाचा मारा करून, आपण त्यांची बुद्धिमत्ता व कार्यक्षमता कमी करतो. तंत्रज्ञानापेक्षा त्या शाळेतील शिक्षक हा मुख्य केंद्रबिंदू असतो. जिथे शिक्षक केंद्रबिंदू असतो, अशाच शाळांचा निकालही गौरवास्पद असतो. कारण शाळेत कोणताही विद्यार्थी ‘ढ’ नसतो, प्रत्येकामध्ये चांगले गुण असतात. केवळ या वेगवेगळ्या बुद्धिमत्तेच्या मुलांना एकत्र बसवून त्यांना शिकविणे, उत्तीर्ण करणे हे प्रत्येक शिक्षकाचे कौशल्य असते.’’ 

जिल्ह्यातील असंख्य शाळा रोल मॉडेल म्हणून उभ्या राहिल्या आहेत. जिल्हा परिषदेच्यावतीने पूरग्रस्तांसाठी जवळपास ३ कोटी रुपयांची मदत केली, त्यामध्ये शिक्षकांचा मोलाचा वाटा असल्याचे अध्यक्ष देवकाते यांनी सांगितले. उपाध्यक्ष वळसे पाटील यांनी प्रास्ताविक केले. या समारंभात आठ प्राथमिक शाळांना अध्यक्ष चषकाने गौरविण्यात आले.

आजी-माजी मंत्र्यांची दांडी
 या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे आदींना निमंत्रित केले होते; पण या चारही आजी-माजी मंत्र्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.

loading image
go to top