
रणनीती यशस्वी !
कोणत्याही मतदानोत्तर चाचण्यांत वर्तविण्यात आल्या नव्हता, त्यापेक्षा जास्त जागा मिळविण्याची किमया आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये साधली, त्या मागे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची रणनीती कारणीभूत ठरली.दिल्लीमध्ये ‘आप’ची सत्ता आहे. तेथील विकास कामांची केजरीवाल यांनी जाणीवपूर्वक प्रसिद्धी पंजाबमध्ये निवडणुकीपूर्वीपासूनच केली होती. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांना केजरीवाल यांनी जाणीवपूर्वक पिण्याचे पाणी, तंबू आदी साधनांची मदत केली होती.
कॅप्टन अमरिंदरसिंग यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविल्यानंतर त्यांचे प्रतिस्पर्धी नवज्योतसिंग सिद्धू यांना काँग्रेसने पाठबळ दिले. त्यामुळे सिद्धू यांची महत्त्वाकांक्षा वाढली. परिणामी काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष वाढला. त्यातच अकाली दलाने भाजपबरोबर युती तोडली. या घडामोडींचा फायदा केजरीवाल यांनी उठविला. निवडणूक घोषित होण्यापूर्वीच त्यांनी प्रचाराची मोहीम राबविण्यास सुरवात केली. त्यासाठी सोशल मीडियावर लक्ष दिले. दिल्लीहून खास ‘टीम’ त्यांनी चंडीगडमध्ये पाठविली. तसेच दिल्लीतील कार्यकर्त्यांची कुमकही त्यांनी पंजाबमध्ये रवाना केली.
दिल्लीतील मोहल्ला क्लिनिक पंजाबमध्ये निर्माण करण्याची घोषणा त्यांनी केली. पंजाबमधील शेतकरी आणि मध्यमवर्गीयांसाठी विजेचे दर हा कळीचा मुद्दा होता. त्यासाठी पहिले ३०० युनिट वीज मोफत देण्याची घोषणा त्यांनी केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि २४ तास नियमित वीज पुरवठा, या मुद्द्यांवर केजरीवाल यांनी प्रचारात रान उठविले. तसेच इतर पक्षांचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार निश्चित नसताना खासदार आणि प्रसिद्ध कॉमेडियन भगवंतसिंग मान यांचे नाव केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदासाठी जाहीर केले. त्यामुळे काँग्रेसलाही मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून चरणजितसिंह चन्नी यांचे नाव जाहीर करावे लागले. त्यातून काँग्रेसचे गणित पुन्हा बिघडले आणि नाराज झालेले सिद्धू प्रचारापासून अलिप्त झाले. तेही ‘आप’च्या पथ्यावर पडले. प्रचाराच्या काळात केजरीवाल यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांवर व्यक्तिगत टीका करण्याचे टाळले. काँग्रेस, अकाली दल आणि भाजपची राजकीय विचारसरणी एकच आहे, हे मतदारांच्या मनावर ठसविण्यात केजरीवाल, ‘आप’चे पंजाबचे सहप्रभारी राघव चड्डा यशस्वी ठरले.
Web Title: Arvind Kejriwal Aam Aadmi Party In Punjab Strategy Success
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..