Punjab Election: काँग्रेस नेतृत्व कधीही शिकणार नाही - कॅप्टन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कॅप्टन अमरिंदर सिंह

Punjab Election: काँग्रेस नेतृत्व कधीही शिकणार नाही - कॅप्टन

चंडीगड : पंजाबमध्ये प्रस्थापितांविरोधी वातावरणामुळे काँग्रेसचा पराभव झाल्याची प्रतिक्रिया पक्षाचे ज्येष्ठ नेते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी दिली होती. त्यावरून, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि पंजाब लोक काँग्रेसचे प्रमुख कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसवर ट्विट करत जोरदार टीकास्त्र सोडले. काँग्रेस नेतृत्व कधीही शिकणार नाही, अशा शब्दांत त्यांनी तोफ डागली.

काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला पंजाबमधील पराभवावर बोलताना म्हणाले होते, की पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल अपेक्षेसारखे नाहीत. उत्तराखंड, गोवा आणि पंजाबमध्ये चांगले यश मिळण्याची आम्हाला अपेक्षा होती. मात्र, मतदारांचे आशीर्वाद घेण्यात आम्हाला अपयश आले.

पक्षाने पंजाबमध्ये नम्र, स्वच्छ आणि तळमळीचे नेतृत्व दिले होते. मात्र, माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्या साडेचारवर्षांच्या कार्यकाळामुळे मतदारांमध्ये प्रस्थापितांविरोधी वातावरण तयार झाले होते. त्यातून त्यांनी बदलासाठी मतदान केले. त्यांच्या या वक्तव्याचा अमरिंदरसिंग यांनी ट्विटरवरून समाचार घेतला. पंजाबसह, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमधील काँग्रेसच्या पराभवाला कोण जबाबदार आहे, असा सवाल त्यांनी केला. पंजाबचे मुख्यमंत्रिपद साडेचार वर्षे भूषविल्यानंतर गेल्यावर्षी अमरिंदरसिंग यांची मुख्यमंत्रिपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. त्यानंतर, त्यांनी काँग्रेसचा त्याग करत स्वतंत्र पक्षाची स्थापना केली होती.

काँग्रेस नेतृत्व कधीही शिकणार नाही. पंजाबसह पाचही राज्यांतील मानहानिकारक पराभवाला कोण जबाबदार आहे. या प्रश्नाचे उत्तर भिंतीवर ठळक अक्षरात लिहिले आहे. मात्र, काँग्रेस नेतृत्व ती वाचणे नेहमीच टाळेल, असे मी मानतो.

- कॅप्टन अमरिंदरसिंग, माजी मुख्यमंत्री, पंजाब

Web Title: Captain Amrinder Sing Congress Leadership Speaks

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top