Punjab assembly Election
Punjab assembly ElectionSakal

Punjab Election 2022: सलून व्यावसायिक, झाड तोडणारा मजूर रिंगणात

प्रत्येक शासकीय खात्यात भ्रष्टाचार असून तो संपवू, असा निर्धारही या दोन उमेदवारांनी केला आहे.

होशियारपूर : मजूर, निराधारांसाठी आवाज उठवण्यासाठी आणि त्यांचे कल्याण करण्यासाठी उरमार विधानसभा मतदारसंघातून एक सलून व्यावसायिक आणि एक झाड तोडणाऱ्या मजुराने मैदानात उडी घेतली आहे. प्रत्येक शासकीय खात्यात भ्रष्टाचार असून तो संपवू, असा निर्धारही या दोन उमेदवारांनी केला आहे. (Punjab assembly Election Updates 2022)

बैंस अवान गावातील रहिवासी बलजित सिंग (वय ३१) हे सलून व्यावसायिक असून ते अपक्ष उमेदवार म्हणून पहिल्यांदाच रिंगणात उतरले आहेत. त्यांनी सातवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. प्रचार करण्यासाठी त्यांनी सलूनचे दुकान काही दिवस बंद ठेवले आहे. त्यांना दरमहा ८ हजार रुपये मिळतात. सध्या ते दररोज सकाळी प्रचारासाठी लवकर घराबाहेर पडतात आणि रात्री उशिरा परतात. प्रचारासाठीचा खर्च हा समर्थकांनी, मित्रांनी दिलेल्या मदतीच्या आधारे करत असल्याचे ते म्हणतात.

समाजातील मागास घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी निवडणूक लढवत असल्याचे ते म्हणाले. भ्रष्टाचाराने विविध खाती बरबटलेले असून आपण निवडून आल्यास त्यावर अंकुश ठेवण्यासाठी काम करू, असे आश्‍वासन ते देतात. विद्यमान सरकार आपल्या मतदारसंघातील विकास कामे करण्यास अपयशी ठरल्याचाही आरोप केला आहे. विधानसभा निवडणुकीत जिंकण्याचा विश्‍वास व्यक्त केला आहे. विशेषत: मतदारसंघातील तरुण, कमी उत्पन्न गटातील मतदार आपल्याला मतदान करतील, असे ते म्हणाले.

झाड तोडणारे मजूर हरजिंदर सिंग हे लाकूड कंत्राटदाराकडे रोजंदारीवर काम करतात आणि ते आता निवडणूक लढवत आहेत. हरजिंदर सिंग (वय ४४) हे नांगल गावचे रहिवासी असून त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. ते नॅशनालिस्ट जस्टिस पार्टीकडून निवडणूक लढवत आहे. त्यांना महिन्याकाठी दहा ते पंधरा हजार रुपये मिळतात. निवडून आल्यास शेतकरी, रोजंदारीवर काम करणारे मजूर, कामगार यांचे आयुष्य बदलून टाकू, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, उरमार मतदारसंघातून काँग्रेसचे विद्यमान आमदार संगत सिंग गिलजिया, बसपचे उमेदवार लखविंदर सिंग, आम आदमी पक्षाचे जसविरसिंग राजा गिल आणि शिरोमणी अकाली दलाचे मनजित सिंग दसुया यांच्यासह ९ उमेदवार मैदानात आहेत.

शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करू

हरजिंदर सिंग यांनी मुलांच्या शिक्षणाच्या दर्जात सुधारणा करण्याची गरज बोलून दाखवली. आपण निवडून आलो तर सरकारी शाळेच्या स्थितीत सुधारणा करू, असे ते म्हणाले. शिक्षण, रोजगार आणि आरोग्य यासारख्या महत्त्वाच्या गोष्टीवर काम करू, असे त्यांनी नमूद केले. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही मुलांना चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचा १९ वर्षाचा मुलगा १२ वीला असून त्याला ९५ टकक्यांपेक्षा अधिक गुण आहेत. त्याने दहावीला ९० टक्के मिळवले होते. तसेच १३ वर्षाची मुलगी नववीत असून तिला ८ वीला ९० टक्के गुण पडले होते. आपले मित्र, समर्थकांकडून निधी गोळा केला जात असून त्यांच्या मदतीने प्रचार करत असल्याचे हरजिंदर सांगतात. पंजाबमध्ये येत्या २० तारखेला मतदान होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com