Punjab Assembly Election: बादल कुटुंबातील पाच जण रिंगणात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Punjab assembly Election
Punjab Assembly Election: बादल कुटुंबातील पाच जण रिंगणात

बादल कुटुंबातील पाच जण रिंगणात, पंजाबमध्ये राजकीय घराणं सक्रिय

अमृतसर : सरदार प्रकाश सिंग बादल यांचे कुटुंब आणि पंजाब, यांचे असलेले नाते विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. चार वेळा पंजाबचे मुख्यमंत्रिपद भूषविलेले प्रकाश सिंग बादल यांच्यासह त्यांचा मुलगा, जावई आदी कुटुंबातील पाच जण निवडणूक रिंगणात आहेत. (Punjab Assembly Election Updates)

पंजाबच्या राजकारणावर पगडा असलेल्या शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष प्रकाश सिंग बादल हे वयाच्या ९४ व्या वर्षी लांबी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत. बादल हे १९७०- ७१, ७७- ८० ९७- २००२ आणि २००७ - २०१७ या दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री होते. शिरोमणी अकाली दल आणि भाजप बरोबरचा गेल्या दहा ते बारा वर्षांचा घरोबा यंदा संपला आहे. भाजपबरोबरची युती तोडून त्यांनी बहुजन समाज पक्षाबरोबर युती केली आहे. बादल यांचे चिरंजीव सुखबीर सिंग हे जलालाबाद मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

हेही वाचा: पुणे : उसाच्या शेतीलगत असलेल्या १०० केव्हीए क्षमतेच्या रोहित्राला आग

त्यांची पत्नी हरसिमरत कौर या खासदार असून मोदी सरकारमध्येही मंत्री म्हणून काम केले. खासदार हरसिमरत कौर यांचे बंधू विक्रम सिंग मजीठिया हे अमृतसर पूर्व विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात आहेत. मजीठा मतदारसंघातून आता त्यांची पत्नी गुरमित कौर शिरोमणी अकाली दलाकडून रिंगणात आहेत. त्यामुळे मजीठिया दांपत्य एकाच वेळेला विधानसभेची निवडणूक लढवीत असून पंजाबमधील एकमेव उदाहरण आहे. प्रकाश सिंग बादल यांचे जावई आदेश प्रताप कैरो हे पत्ती मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत.

‘आप’चे चन्नींसमोर आव्हान

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी हे भादौर या आरक्षित मतदारसंघातून उभे असून त्यांच्याविरोधात आम आदमी पक्षाने लभसिंग उगोक यांना तिकीट दिले आहे. लभसिंग यांचे वडिल वाहनचालक असून आई स्वच्छता कर्मचारी आहे.

चन्नी यांनी त्यांच्या चमकौर साहिब मतदारसंघातून अर्ज दाखल केला होता. मात्र, काँग्रेसने त्यांना भादौर या आणखी एका मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा आदेश दिल्यानंतर हा मतदारसंघ चर्चेत आला. चन्नी यांच्यामागे काँग्रेसने ताकद उभी केली असली तरी त्यांचा या निवडणूकीत पराभव होईल, असा विश्‍वास लभसिंग यांनी व्यक्त केला आहे. लभसिंग उगोक यांनी २०१३ मध्ये कार्यकर्ता म्हणून आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. त्यांचे मोबाईल दुरुस्तीचेही दुकान होते. आपले वडिल वाहनचालक असून आई सरकारी शाळेत स्वच्छता कर्मचारी आहे, अशी माहिती त्यांनीच दिली आहे.