
‘‘ए क मौका देना केजरीवाल नु, एक मौका देना भगवंत मान नु,’’ हे पंजाबच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आम आदमी पक्षाचे (आप) प्रचारगीत वाजत होते. ज्या प्रकारे पंजाबमध्ये प्रस्थापितांना हादरा देणारे निकाल आले आहेत ते पाहता खरोखर पंजाबी मतदारांनी ‘आप’चे अध्यक्ष अरविंद केजरीवाल आणि मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार भगवंत मान यांना ‘मौका’ दिला आहे. पंतप्रधान होण्यापूर्वी नरेंद्र मोदींनी देशात ‘गुजरात मॉडेल’चे स्वप्न विकले अगदी तशाच प्रकारे ‘दिल्ली मॉडेल’चे स्वप्न पंजाबमध्ये विकण्यातही केजरीवाल यशस्वी झाले आहेत.
पंजाब खिशात घातल्याने, २०१५ पासून दिल्लीत सत्तेत असलेला आम आदमी पक्ष आता आता एकापेक्षा अधिक राज्यात सत्तेत येणारा एकमेव बिगरभाजप आणि बिगर काँग्रेस पक्ष बनला आहे. दुसरे म्हणजे, कॅप्टन अमरिंदरसिंग, सुखबीर बादल, चरणजितसिंग चन्नी, नवज्योतसिंग सिद्धू या चर्चेतील चेहऱ्यांना घरी बसविणाऱ्या पंजाबच्या निकालांनी दाखविले आहे, की राजकीय भाषणबाजी, आंदोलन किंवा भावनिक मुद्दे वगैरे ठीक आहेत, परंतु वीज, पाणी, प्रशासन या किमान नागरी सुविधांची गरज मतदारांना अधिक वाटते.यापूर्वी पंजाबमध्ये एक तर काँग्रेसची किंवा शिरोमणी अकाली दलाची सत्ता राहिली आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष या शर्यतीत उतरला. परंतु खालिस्तानवाद्यांचा समर्थक हा शिक्का बसल्याने या पक्षाला फक्त २० जागांवर समाधान मानावे लागले. या वेळीही केजरीवाल आणि खालिस्तानी फुटीरवाद्यांचे संगनमत असल्याचे आरोप झाले. केजरीवाल यांचे जुने सहकारी कुमार विश्वास यांनी तर, केजरीवाल यांना वेगळ्या खलिस्तानचे पंतप्रधान व्हायचे आहे असे म्हटले होते. पण मतदारांनी ते धुडकावले आणि ‘बदलाव’ या चर्चेतील शब्दाच्या ‘झाडूने’ सारे काही झाडून काढले.
दिल्लीच्या सीमेवर वर्षभर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केजरीवाल सरकार शांतपणे मदत करत राहिले. या शेतकऱ्यांनी सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या दिल्लीच्या सीमांवरून आप सरकारची तोंडी जाहिरात पंजाबच्या गावखेड्यापर्यंत नेली. त्यामुळे काँग्रेस किंवा अकाली दलासारखी संघटनात्मक ताकद नसतानाही आम आदमी पक्षाला ही मुसंडी मारता आली. शेतकरी आंदोलनाला सुरुवातच मुळात पंजाबमधून झाली होती आणि उत्तर प्रदेश मार्गे ते दिल्लीच्या राजकारणात दाखल झाले होते. डाव्या संघटनांकडे या आंदोलनाचे असलेले नेतृत्व आणि काँग्रेसने पुरविलेले बळ पाहता, शेतकरी आंदोलनाचा किमान फायदा आपल्याला पंजाबमध्ये मिळेल, या भ्रमात काँग्रेसचे नेतृत्व राहिले.
शहीद भगतसिंग यांच्या गावी होणार शपथविधी
चंडीगड : पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने (आप) लखलखीत यश मिळविले. राज्यातील एकूण ११९ जागांपैकी ९१ जागांवर पक्षाने विजय मिळविला. ‘आप’चे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असलेले भगवंत मान हे पदाची शपथ राजभवन येथे नाही तर शहीद भगतसिंग यांच्या मूळ गावी म्हणजे नवानशहर जिल्ह्यातील खटकर कला येथे घेणार आहेत. मान म्हणाले, ‘‘ मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी राजभवन येथे न होता खटकर कला गावात होणार आहे. शपथविधीच्या तारखा नंतर जाहीर होतील.
काँग्रेसची वाईट अवस्था
या निवडणुकीत सर्वांत वाईट अवस्था काँग्रेसची झाली. काँग्रेस नेतृत्वाने ज्या पद्धतीने पंजाबमध्ये खेळखंडोबा केला, तो कुऱ्हाडीवर पाय मारणारा होता. ज्या सत्ताविरोधी (अॅन्टीइन्कम्बन्सी) लाटेची चाहूल लागल्याचा दाखला देत राहुल गांधी आणि प्रियांका गांधींनी कॅप्टन अमरिंदरसिंग यांना मुख्यमंत्री पदावरून हटवून चरणजितसिंग चन्नी यांना आणले. परंतु, चन्नी, प्रदेशाध्यक्ष सिद्धू आणि माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांच्या लाथाळ्या आवरताना गांधी भावंडांचे नेतृत्वच उघडे पडले.
भाजपही अपयशी
भाजपची व्यूहरचनाही सपशेल अपयशी ठरली आणि कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यावर जुगार खेळण्याचा डाव फसला. चंडीगड महापालिका निवडणुकीतील यशानंतर भाजप शहरी भागात आणि हिंदू मतदारांमध्ये करिष्मा दाखवेल असा अंदाज लढविला जात होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींची सुरक्षा धोक्यात आल्याचा भाजपचा भावनिक मुद्दाही पंजाबमधील मतदारांनी स्वीकारला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.