
पंजाबच्या जनतेने क्रांती काय असते, दाखवून दिले : अरविंद केजरीवाल
नवी दिल्ली : पंजाबच्या जनतेने क्रांती काय असते, दाखवून दिली आहे. पंजाबमधील अनेक बड्या नेत्यांना विधानसभा निवडणुकीत हरवून पंजाबच्या जनतेने चमत्कार घडविला आहे, अशी शब्दांत आम आदमी पक्षाचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांनी निवडणुकीतील विजयावर आनंद व्यक्त केला. पंजाबमध्ये पक्षाला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर केजरीवाल यांनी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित केले. ते म्हणाले, की आम आदमी पार्टीने व्यवस्था बदलली आहे. पंजाबमध्ये खुर्च्या हलल्या आहेत. भगतसिंग म्हणाले होते की, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर व्यवस्था बदलली नाही तर काही होणार नाही. खेदाची गोष्ट म्हणजे आधीच्या पक्षांनी तीच ब्रिटिश व्यवस्था देशात ठेवली. आम आदमी पार्टीने गेल्या सात वर्षात ही व्यवस्था बदलली आहे.
आम्ही प्रामाणिक राजकारण सुरू केले आहे. आता शाळा बांधल्या जात आहेत, गरीब मुले शिक्षण घेत आहेत. खरा दहशतवादी कोण आहे हे पंजाबच्या लोकांनी सिद्ध केले आहे. खूप मोठ्या शक्ती देशाला पुढे जाण्यापासून रोखू इच्छित आहेत. पंजाबमध्ये किती मोठे कारस्थान झाले ते तुम्ही पाहिले. आम आदमी पार्टीच्या विरोधात सर्वजण एकत्र आले. आपला सत्तेत येऊ नये, हाच सर्वांचा हेतू होता. शेवटी सर्वांनी एकत्र येऊन केजरीवाल दहशतवादी असल्याचे सांगितले. पण या निकालातून केजरीवाल दहशतवादी नव्हे; तर देशाचा खरा सुपुत्र आहेत, हे पंजाबच्या जनतेने सांगून टाकले आहे, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले.
आम्ही असा भारत बनवू की जिथे द्वेषाला जागा नसेल. जिथे कोणीही उपाशी झोपणार नाही, जिथे गरीब-श्रीमंतांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळेल. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही आपल्या मुलांना वैद्यकशास्त्र शिकण्यासाठी युक्रेनसारख्या देशात जावे लागत आहे, याचे वाईट वाटते. असा भारत आम्ही बनवू जिथे भारतातील मुलांना युक्रेनला जावे लागणार नाही. आम्ही जागतिक दर्जाची वैद्यकीय महाविद्यालये इथेच उभारू. त्यात देशभरातून मुले येथे शिकायला येतील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
Web Title: Punjab Assembly Elections 2022 People Of Punjab Showed What A Revolution Arvind Kejriwal
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..