कहाणी घसरत्या पंजाबची...

पाकिस्तानातून ड्रोनद्वारे हल्ला होण्याचा धोका सध्या पंजाबपुढे असल्याचे चित्र उभे केले जात असले तरी प्रत्यक्षात पंजाबमध्येच अनेक धोके आ वासून उभे आहेत आणि ते पाकिस्तानी ड्रोनपेक्षा कितीतरी पट अधिक आहेत.
Punjab
PunjabSakal

विधानसभा निवडणुकांसाठी रणशिंग फुंकले गेले असून पाच राज्यांत सत्ता हस्तगत करण्यासाठी सर्वच प्रमुख पक्षांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यातही उत्तर प्रदेश आणि पंजाबकडे देशाचे लक्ष लागलेले आहे. पाकिस्तानातून ड्रोनद्वारे हल्ला होण्याचा धोका सध्या पंजाबपुढे असल्याचे चित्र उभे केले जात असले तरी प्रत्यक्षात पंजाबमध्येच अनेक धोके आ वासून उभे आहेत आणि ते पाकिस्तानी ड्रोनपेक्षा कितीतरी पट अधिक आहेत.

पंजाबचा क्रमांक घसरला...

पंजाब भारतातील सर्वात श्रीमंत राज्य...ही गोष्ट २० वर्षे जुनी झालेली आहे. कारण सद्यःस्थितीचा विचार केल्यास पंजाब पंधराव्या क्रमांकावर घसरलेले आहे. अगदी केंद्रशासित प्रदेश जरी जोडले तरी महाराष्ट्र, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात ही मोठी राज्ये यामध्ये खूपच पुढे आहेत. नाममात्र प्रतिभांडवली उत्पन्नाच्या मापदंडानुसार जरी पाहिले तर अरुणाचल प्रदेशही पंजाबला मागे टाकतो. राष्ट्रीय दरडोई उत्पन्न सरासरीपेक्षा वरच्या राज्यांच्या यादीत पंजाब १९ व्या क्रमांकावर आहे. त्या पाठोपाठ पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो; मात्र सद्यःस्थिती पाहता येत्या काही दिवसांत पश्चिम बंगाल पंजाबला मागे टाकू शकेल. पंजाबी अहंकाराला आणि रूढींना हा मोठा धक्का आहे.

विधानसभा निवडणुकीनिमित्ताने काही दिवसांपासून पंजाबातील राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघालेले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. यातही राज्याच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करून त्या मुद्याला निवडणूक प्रचारातील प्रमुख मुद्दा करण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि त्यांच्या सरकारमधील त्यांचे सहकारी व सध्याचे त्यांच्या विरोधातील पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी हाच मुद्दा राज्यापुढे असल्याची रचना करून प्रचार केला जात आहे. अमरिंदर यांच्यासोबत जेव्हा मी बोललो तेव्हा त्यांनी पाकिस्तान कसे ड्रोनद्वारे शस्त्रे, स्फोटके, ड्रग्ज आणि आयईडी पंजाबमध्ये पाठवून राज्याला धोका पोचवत आहेत, याविषयी अगदी खात्रीने सांगितले.

आमच्या राजकीय संपादकांसोबत बोलताना चन्नी यांनी हे मुद्दे खोडून काढताना या आरोपांची खिल्ली उडविली. अमरिंदर भीती पसरवण्यासाठी असा आरोप करत असल्याचे ते म्हणाले. प्रत्यक्षात पंजाबमधील स्थिती खूपच भयानक आहे. पाकिस्तानी ड्रोन त्यांच्या केंद्रस्थानी नाहीत. पंजाबपुढे अनेक धोके आहेत आणि त्यातील बहुतेक राज्यांतर्गतच आहेत. यातील काहींसाठी केंद्राला दोष देता येईल; मात्र बहुतांश धोक्यांना पंजाबमधील जनता स्वतःच जबाबदार आहे आणि जोपर्यंत ते या धोक्यांकडे गांभीर्याने पाहत नाहीत तोपर्यंत त्यांच्या भावी पिढ्यांना फटका बसत राहणार, हे नक्की. राज्यात सत्तेत कोणताही पक्ष आला तरी प्रश्न सुटणार नाहीत अशीच परिस्थितीच आहे.

काँग्रेस, आप, शिरोमणी अकाली दल आणि अमरिंदर-भाजप हे चार प्रतिस्पर्धी गट देत असलेली सर्व आश्वासने पाहिली की आश्चर्य वाटते. पंजाब स्वतःच्या इच्छेने बंदिस्त जीवन जगत आहे, ते आळशी बनलेले आहे आणि स्वतःमध्येच रममाण झालेले आहे. त्यांना बदलण्यासाठी कोणीही प्रयत्न करत नाही वा तसे आश्वासनही देत नाही. उलट पंजाबच्या जनतेला आणखीनच फुकट देण्याचा प्रयत्न होत आहे. विद्यमान आमदार वीजदर कमी करतात आणि वीज बिले सार्वजनिकरित्या जाळतात. यावर कडी करताना आम आदमी पक्ष प्रत्येक महिलेला दरमहा एक हजार रुपये देण्याचे आश्वासन देत आहे आणि हे आश्चर्यकारक आहे.

पंजाब देशातील सर्वात श्रीमंत, आनंदी, मजबूत, लाखो स्थलांतरित मजुरांना रोजगार देणारे, देशाचे तांदूळ आणि गव्हाचे कोठार असल्याच्या स्मृतिरंजनात देशातील नागरिक आहेत. अशा राज्यातील महिलांना दरमहा केवळ एक हजार रुपये भुरळ घालू शकतात, हा विश्वास ‘आप’सारख्या राजकीय पक्षाला कसा काय वाटू शकतो? पंजाबमध्ये काम करणारे भैये तीन दिवसांच्या कामासाठी एक हजार रुपये कमावतात...हे एकमेकांशी कसे जोडणार?

पंजाबची अशी अवस्था का झाली असेल? मध्य प्रदेशने आधुनिक शेतीची कास धरत केव्हा पंजाबला मागे टाकले आहे. देशात सद्यःस्थितीत येथे गव्हाचे सर्वाधिक उत्पादन होत आहे. मात्र पंजाब आहे तेथेच थबकलेला आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान दिल्लीभोवती जे काही दिसले ते दोलायमान, विविधरंगी आणि मस्त होते. पण त्यामध्ये अऩेक जमीनमालक असू शकतात. त्यातील एक कारण म्हणजे भैये शेतात राबत होते आणि जमीनमालकांची मुले बेकायदेशीररित्या पंजाबात जाण्याचे जुगाड करण्यात व्यस्त होती. किती विरोधाभास आहे पाहा...शेतात राबण्यासाठी लाखो स्थलांतरित मजूर तेथे येत आहेत आणि पंजाबमधील मुले मात्र परदेशात जाऊन तेथेच स्थायिक होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. प्रत्यक्षात अशा प्रकरणांमधून येणारी निराशा, मादक पदार्थांच्या आहारी जाणे, बेकायदा परदेशी जाणे यामुळे पंजाब धोक्यात आला आहे. येथील नागरिकांना खाण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त आहे. मात्र, त्यांच्याकडे रोजगार नाही, की उद्योजकतेची संस्कृती नाही. शेवटी यूट्यूबवर पोर्तुगाल-मॉडर्न स्लाव्हेरी फॉर एन ईयू पासपोर्ट हा माहितीपट पाहा. १५ हजार युरो भरून अनेक पंजाबींची तस्करी केल्याचे तुम्हाला पाहायला मिळेल.

(अनुवाद : प्रसाद इनामदार)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com