
बजेटबाबत बोलताना चेतन भगत म्हणतो, 'डोळ्यांसमोर निवडणुका असताना...'
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Budget 2022) यांनी आज (मंगळवारी) लोकसभेत 2022 चा अर्थसंकल्प सादर केला आहे. (Nirmala Sitharaman) 2022 च्या अर्थसंकल्पात जनतेसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पामध्ये कशाप्रकारे तरतुदी असतील, याकडे सर्वांचंच लक्ष लागून होतं. तसेच येत्या काही दिवसांवरच पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या राज्यातील मतदारांना चुचकारण्यात येईल का, याकडेही सर्वांचंच लक्ष लागून होतं.
हेही वाचा: 'त्या' ऐतिहासिक बजेटवेळी खुद्द पंतप्रधानांनी मागितली होती माफी!
या अर्थसंकल्पावर विविध स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया पुढे येत आहेत. काहींना हा अर्थसंकल्प दिलासा देणारा असल्याचं म्हटलंय की, काहींनी हा सामान्यांच्या तोंडाला पाने पुसणारा अर्थसंकल्प असल्याचं म्हटलंय.
लेखक चेतन भगत यानेही या अर्थसंकल्पावर आपलं मत मांडलंय. त्याने म्हटलंय की, मला वाटतं की, मोठ्या निवडणुकांच्या 10 दिवस अगोदर कोणतेही मोठे मोफत किंवा लोकांना भुरळ पाडतील अशा घोषणा न करता एक विवेकपूर्ण असा अर्थसंकल्प सादर करण्याची ही कृती खूपच जबाबदार आणि प्रशंसनीय आहे.
दुसरीकडे ज्येष्ठ कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना अर्थसंकल्पाचे वर्णन अत्यंत निराशाजनक असे केले. आपण जेवढे भाषण ऐकले त्यात ना मनरेगाचा उल्लेख होता ना संरक्षण क्षेत्रासाठी काही ठोस होते. महागाई वाढत असताना मध्यमवर्गाला प्राप्तिकरात काहीही दिलासा नाही. गती शक्ती व डिजिटल चलनाच्या केवळ घोषणाच आहेत, अशीही टीका त्यांनी केली.
हेही वाचा: Budget 2022 : परवडणाऱ्या घरांसाठीची तरतूद बांधकाम क्षेत्राच्या प्रगतीसाठी महत्त्वाची
उद्दिष्टपूर्तीची दिशा हरवलेला अर्थसंकल्प : मुख्यमंत्री
कोरोना प्रादुर्भावामुळे सुक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासमोर मोठी आव्हाने उभी राहिली आहेत, लोकांची क्रय शक्ती कमी होत असतांना खासगी क्षेत्रातील गुंतवणूक कमी होत आहे . अशा परिस्थितीत केंद्रीय अर्थसंकल्पातून काही ठोस उत्तरे मिळतील अशी अपेक्षा होती, परंतु लोकमनातील ही अस्वस्थता केंद्र सरकारपर्यंत पोहोचलेलीच दिसत नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प नोकरदारांसह सर्वसामान्यांच्या अपेक्षांचा भंग करतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
Web Title: Budget 2022 Chetan Bhagat Says Prudent Budget With No Major Freebies 10 Days Before A Major Election
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..