
वसंत कुलकर्णी - ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार
सप्टेंबर २०२४ मध्ये बाजार निर्देशांक नव्या शिखराला स्पर्श करून मोठ्या घसरणीला सामोरे गेले. मार्चच्या मध्यापासून बाजार सावरले असले, तरी अस्थिरता वाढली आहे. मूल्यांकनाची चिंता, विशेषतः कंपन्यांच्या ‘ईपीएस’मधील संथ वाढ लक्षात घेता अजून वर्षभर तरी निर्देशांक मोठ्या वृद्धीची नोंद करणार नाहीत, असा संस्थात्मक गुंतवणूकदारांचा कयास आहे. मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये मोठ्या घसरणीमुळे लार्ज कॅप फंड, मिड कॅप आणि स्मॉल कॅप फंडातील परताव्यात फार फरक राहिलेला नाही. म्हणून, लार्ज कॅपकडे झुकलेले परंतु, मिड कॅप आणि स्मॉल कॅपचा गुंतवणुकीत समावेश असलेले फ्लेक्सिकॅप फंड वाजवी जोखीम घेणाऱ्या गुंतवणूकदारांना आकर्षित करतील अशी अाशा आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात सात वर्षे पूर्ण करणारा टाटा फ्लेक्सिकॅप पोर्टफोलिओमध्ये ‘कॅटॅलिस्ट’चे काम करू शकतो.