

एशियन पेंट्स आणि वरुण बेव्हरेजेस : स्पर्धेतील नवे आव्हान
E sakal
भूषण ओक
bhushanoke@hotmail.com
‘सकाळ मनी’ मासिकाच्या या सदरातून आपण आजपर्यंत बालाजी अमिन्स, शिवालिक बायमेटल्स कंट्रोल्स, आयआरसीटीसी, सीडीएसएल, कॅम्स, प्राज इंडस्ट्रीज, कोल इंडिया आणि नाल्को या कंपन्यांचा अभ्यास केला. व्यवसायात मोठा स्पर्धात्मक फायदा हाच याचा निकष होता. आता आपण वरुण बेव्हरेजेस आणि एशियन पेंट्स या कंपन्यांचा लेखाजोखा बघू या...
खंदक (मोट) किंवा एकाधिकार द्विअधिकार (मोनोपोली ड्युओपोली) आणि नव्या स्पर्धकांसाठी प्रवेश प्रतिबंध (एंट्री बॅरियर) ही दीर्घ मुदतीच्या आणि टिकाऊ अशा स्पर्धात्मक फायद्याची सर्व रूपे व्यवसायात स्पर्धा टाळतात किंवा कमीतकमी ठेवतात आणि पर्यायाने व्यवसायाची सुरक्षितता वाढवितात.
अशा व्यवसायात मार्जिन बहुधा स्थिर असतात आणि व्यवसाय आणि नफावाढीला भरपूर वाव असतो. आयआरसीटीसी, प्राज इंडस्ट्रीज आणि कोल इंडिया या जवळजवळ एकाधिकार असलेल्या कंपन्या आहेत, तर शिवालिक बायमेटल्स वगळता इतर सर्व कंपन्यांना एकच मोठा प्रतिस्पर्धी आहे.
या महत्त्वाच्या गुणांमुळे या कंपन्यांचे आकडे वर्षानुवर्षे उत्तम आहेत. कंपन्यांना असा स्पर्धात्मक फायदा बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींमधून मिळू शकतो. जसे प्राज कंपनीला हा फायदा तांत्रिक ज्ञान आणि पेटंटद्वारे, तर आयआरसीटीसी आणि कोल इंडिया यांना सरकारी धोरणांमुळे मिळतो. बालाजी अमिन्सला हा फायदा केमिकलच्या किचकट उत्पादन प्रक्रिया आणि तंत्रज्ञानामुळे मिळतो.
शक्तिशाली ब्रँड किंवा कंपनीचा आकार खूप मोठा असणे आणि त्यामुळे उत्पादनखर्च प्रतियुनिट कमी असणे (इकॉनॉमी ऑफ स्केल) हाही एक स्पर्धात्मक फायदा असू शकतो. प्रत्येकच कंपनी असा स्पर्धात्मक फायदा मिळवण्याचा प्रयत्न करत असते. कोणताही व्यवसाय खूप फायदेशीर असला, की कालांतराने त्यात स्पर्धा निर्माण होतेच आणि त्यानंतर त्या कंपनीच्या नफावृद्धीवर गंभीर परिणाम होतात. या दृष्टीने आयआरसीटीसी, प्राज इंडस्ट्रीज आणि कोल इंडिया यांचे व्यवसाय सरकारी पाठबळ आणि तांत्रिक क्षमतेमुळे सर्वांत सुरक्षित व्यवसाय आहेत.