
Coal India's Role in India's Energy Mix and Economic Growth explained in detail with stock Analysis
भूषण ओक, शेअर बाजाराचे अभ्यासक-विश्लेषक
bhushanoke@hotmail.com
कोल इंडिया ही सरकारी क्षेत्रातील कोळसा उत्पादनामध्ये जवळजवळ एकाधिकारशाही असलेली एक उत्तम कंपनी आहे. अद्याप या कंपनीला तिच्या पात्रतेचे मूल्यांकन मिळालेले नाही; मात्र भविष्यात बाजार ही विसंगती दूर करून कंपनीला योग्य ते मूल्यांकन देईल असे वाटते. या कंपनीची व्याप्ती, बलस्थानांसह एकंदर आर्थिक परिस्थिती यांचा सांगोपांग आढावा घेणारा हा लेख...
भारताच्या आठ राज्यांमधील ८४ खाण क्षेत्रांमध्ये ही कंपनी प्रामुख्याने कोळसा खाणकाम आणि उत्पादन करते. त्यात एकूण ३१३ कार्यरत खाणी आहेत. यात १२९ भूमिगत, १६८ ओपनकास्ट आणि १३ मिश्र प्रकारच्या खाणी आहेत. कंपनीचे कोळसा शुद्धीकरण कारखानेदेखील आहेत. त्यात कोळशातील सल्फर आणि राखेसारखे अशुद्ध घटक काढून टाकून बॉयलरसाठी शुद्ध कोळसा तयार केला जातो. कोळसा भारतात भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्याने कोल इंडिया कंपनीचे भारताच्या ऊर्जा क्षेत्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे. आतापर्यंत कोळशाच्या उपलब्ध साठ्यापैकी सुमारे १६ अब्ज टन कोळशाचे उत्पादन झाले आहे; पण आणखी ५५ अब्ज टन कोळसा उत्खननासाठी उपलब्ध आहे.
पर्यायी आणि पर्यावरणस्नेही ऊर्जास्रोतांच्या विकासावर सध्या खूप भर असला, तरी भारताच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यात कंपनीची मोठी भूमिका आहे. येणाऱ्या दोन दशकांमध्ये तरी भारताच्या इंधन मिश्रणात कोळसा हा एक प्रमुख आणि परवडणारा स्रोत राहील, अशी अपेक्षा आहे.
‘भेल’ या कंपनीच्या सहकार्याने स्थापन झालेल्या भारत कोल गॅसिफिकेशन अँड केमिकल्स लि. या नवीन उपकंपनीद्वारे कंपनी कोळशाच्या इंधनवायू रूपांतरण प्रकल्पातदेखील सहभागी आहे. मोझांबिकमधील एक उपकंपनी धरून या कंपनीच्या १२ उपकंपन्या आहेत आणि बऱ्याच उप-उपकंपन्या आणि संयुक्त उपक्रमही आहेत. यापैकी दोन उपकंपन्या पर्यायी ऊर्जेच्या क्षेत्रात असून, एक उपकंपनी कोळशाचे इंधनवायूमध्ये रूपांतरण करण्याच्या क्षेत्रात आहे.