

From IT Jobs to Medicinal Grass Farming
esakal
सुधीर जोगळेकर - sumajo51@gmail.com
‘‘रं गरंगुल्या, सानसानुल्या, गवतफुला रे गवतफुला;
असा कसा रे मला लागला, सांग तुझा रे तुझा लळा.’’
इंदिरा संत यांची गवताविषयीची ही कविता शालेय वयात बहुधा अनेकांनी पाठ्यपुस्तकात वाचली असेल. मात्र, त्या गवतफुलाशी आयुष्याचं नातं जोडण्याचा आणि संगणकशास्त्रातलं सारं ज्ञान व अभ्यास बाजूला ठेवून गवत हेच चरितार्थाचं माध्यम बनवण्याचा ध्यास ज्यांनी घेतला, ते गवतवेडं जोडपं म्हणजे
चांगली नोकरी, भरभक्कम पगार आणि आरामदायी जीवनशैली असूनही अस्वस्थ मनांना शांत झोप लागत नाही, हेच खरं. दिलीप परब आणि गौरी परब हे असंच एक अस्वस्थ दाम्पत्य. दिलीप मूळचा देवगडचा, तर गौरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातल्या तिठवली गावची. दोघांचंही शिक्षण मुंबईत झालं. अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना त्यांची ओळख झाली, मैत्री वाढली आणि स्वप्नं रंगू लागली. दोघांनीही २००८ मध्ये संगणक विज्ञानाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि लार्सन अँड टुब्रोमध्ये नोकरीला लागले. काही वर्षे एकत्र काम केलं, लग्नही झालं. सर्व काही सुरळीत सुरू होतं; पण समाधान मिळत नव्हतं. गावाची ओढ सतावत होती.
नुसते पैसे कमावत राहायचं किती दिवस? गावी जाऊन आपल्याला जे शिकायला मिळालं ते इतर मुलांनाही द्यायला हवं, हा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. दोघांच्याही घरची शेती होती. त्या शेतीशी संबंधित काही करता येईल का, हा विचारही सतत डोक्यात होता. अखेर २००८ मध्ये त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. दिलीपच्या देवगडमधील वडिलोपार्जित आंब्याच्या बागेकडे लक्ष द्यायचं आणि त्याचबरोबर गावातील मुलांना संगणक शिक्षण द्यायचं, असा निर्धार त्यांनी केला. त्यासाठी ‘युवालक्ष्य’ नावाची संस्थाही स्थापन केली. मात्र, तो काळ अखंडित इंटरनेट सेवेचा नव्हता. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आणि अखेर ‘युवालक्ष्य’ला टाळं ठोकावं लागलं. पुढे काय, हा प्रश्न उभाच होता. केवळ आंब्याच्या बागेवर समाधान मानण्यात अर्थ नव्हता. तेवढ्यासाठी त्यांनी लार्सन अँड टुब्रोची नोकरी सोडली नव्हती. त्यांनी २०१५-१६ च्या सुमारास गारमेंट व्यवसायात उतरण्याचा विचार केला. केळ्याच्या बुंध्यातून तलम धागा काढून त्यापासून पैठणी तयार करण्याची कल्पना होती. त्यासाठी जागा, कच्चा माल आणि इतर तयारी सुरू असतानाच गवतापासून तयार होणाऱ्या ‘इसेन्शियल ऑइल’ला जगभर मोठी मागणी असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर सुरू झाला योग्य जमीन आणि उत्पन्नक्षम गवताच्या जातींचा अभ्यास. आयुर्वेदातील ग्रंथ वाचताना त्यांना लक्षात आलं, की कोकणची जमीन औषधी वनस्पतींसाठी अत्यंत उपयुक्त आहे. अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती येथे नैसर्गिकरीत्या उगवतात. साऱ्या जगाची औषधी वनस्पतीची मागणी पुरी करता येईल इतक्या प्रकारच्या वनस्पती इथे निसर्गतःच पिकतात; पण आंबा-काजू या नगदी उत्पन्न देणाऱ्या पिकांच्या हव्यासात औषधी वनस्पती बेहिशेबी तोडल्या गेल्या. आंबा आणि काजूसारख्या नगदी पिकांच्या वाढत्या लागवडीमुळे या वनस्पती दुर्लक्षित झाल्या.