

Fiem Industries share analysis auto components LED lighting business financial performance valuation investment outlook India
Sakal
भूषण ओक, शेअर बाजार विश्लेषक
दुचाकी वाहनांच्या मागणीत २०२६ मध्ये सुमारे १० टक्के वाढ दिसली. विद्युत दुचाकींवरील जीएसटी कमी झाल्याने त्यांची मागणी जवळजवळ २२ टक्क्यांनी वाढली. क्विक कॉमर्स आणि इतर डिलिव्हरी व्यवसायांमुळे दुचाकी वाहनांची मागणी वाढतीच राहण्याची शक्यता आहे. फिएम इंडस्ट्रीज ही १९८९ मध्ये स्थापन झालेली आणि २००६ मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झालेली कंपनी आहे. ही कंपनी दुचाकी वाहनांसाठी आणि काही प्रमाणात चारचाकी वाहनांसाठीही विविध प्रकारचे लायटिंग आणि आरशांचे उत्पादन करते. दुचाकी वाहनांच्या सुट्या भागांचा कंपनीच्या एकूण उत्पन्नात ९७ टक्के वाटा असून, चारचाकी वाहनांच्या सुट्या भागांच्या उत्पादनाचा वाटा हळूहळू वाढत आहे. एकूण उत्पन्नात एलईडी लायटिंगचा ४८ टक्के, तर पारंपरिक लायटिंगचा २८ टक्के वाटा आहे. एलईडी लायटिंगची किंमत तुलनेने जास्त असली, तरी त्याची मागणी सातत्याने वाढत आहे. कंपनी राज्य परिवहन मंडळांच्या बसांसाठी एलईडी-आधारित प्रवासी सूचना प्रणालीही पुरवते. तसेच, आता रेल्वेसाठीही हे काम सुरू होणार आहे. कंपनीची निर्यात दोन टक्क्यांपेक्षा कमी आहे. कंपनीच्या जपान आणि इटलीमध्ये दोन उपकंपन्या असून, हाँगकाँगमध्ये एक संयुक्त उपक्रम (जेव्ही) आहे. कंपनीचे देशात नऊ उत्पादन प्रकल्प आणि तीन संशोधन व विकास केंद्रे आहेत.