

Income Tax Return
esakal
दीपाली किणीकर - kinikardeepali@gmail.com
निवृत्तीनंतर आयुष्य शांत आणि निर्धास्त होईल, असा अनेकांचा समज असतो. मात्र, वास्तव थोडे वेगळे असते. पगार थांबल्यानंतरही कराची जबाबदारी संपत नाही; उलट नव्या उत्पन्नस्रोतांमुळे ती अधिक गुंतागुंतीची होऊ शकते. म्हणूनच निवृत्तीनंतरचे पहिले प्राप्तिकर विवरणपत्र अर्थात इन्कम टॅक्स रिटर्न हे अनेकांसाठी गोंधळाचे ठरते आणि योग्य माहिती नसल्यास ते महागातही पडू शकते. त्यावर टाकलेला हा प्रकाशझोत...
वानिवृत्तीचा निरोप समारंभ नुकताच पार पडला होता. ३५ वर्षे नोकरी केलेल्या देसाईसाहेबांच्या चेहऱ्यावर समाधान होते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी निवांत चहा घेतला. पेन्शन सुरू होणार होती, ग्रॅच्युइटी खात्यात जमा झाली होती आणि आता आयुष्य शांततेत जाईल, असे त्यांना वाटत होते; पण काही महिन्यांतच बँकेकडून व्याजातून ‘टीडीएस’ कापल्याचा संदेश आला, म्युच्युअल फंडातून काढलेल्या रकमेवर झालेला कराचा परिणाम समजला आणि नंतर प्राप्तिकर विवरणपत्राबाबत (इन्कम टॅक्स रिटर्न) विचारणा झाली. तेव्हा त्यांना जाणवले, की नोकरी संपली म्हणजे कर जबाबदाऱ्या (टॅक्स लायबिलिटी) संपल्या, असे समजणे चुकीचे आहे. अनेक निवृत्त व्यक्तींना वाटते, की निवृत्तीनंतर प्राप्तिकराबाबतचे व्यवहार आपोआप सोपे होतात. निवृत्तीनंतर प्राप्तिकराची जबाबदारी आणि गुंतागुंत कमी होईल, असा समज असतो. परंतु, हा मोठा गैरसमज आहे. खरे तर निवृत्तीनंतरचे पहिले वर्ष हेच टॅक्ससंबंधी सर्वांत गोंधळाचे असते, कारण बदललेल्या उत्पन्नाबाबत आणि प्राप्तिकर विवरणपत्र (आयटीआर) प्रक्रियेबाबत पुरेशी माहिती नसते. याच काळात पगाराचे उत्पन्न थांबते आणि पेन्शन, बँक ठेवींवरील व्याज, भाडे, म्युच्युअल फंड, शेअर, सल्लागार मानधन, परदेशी गुंतवणूक अशा विविध स्रोतांमधून उत्पन्न सुरू होते. त्यामुळे पहिल्याच वर्षी अनेकांकडून नकळत चुका होतात. तुम्ही लवकरच निवृत्त होणार असाल, तर सावधान! निवृत्तीनंतरचा पहिला टप्पा आनंदाचा असला, तरी प्राप्तिकराच्या बाबतीत तो थोडा गोंधळात टाकणारा असू शकतो. काही छोट्या चुका प्राप्तिकर विभागाकडून नोटीस येण्यास कारणीभूत ठरू शकतात.