उत्तम गुंतवणूक : फोर्स मोटर्स (शुक्रवारचा बंद भाव : रु. २०,३७८)

एलसीव्ही बाजारात ७०% वाटा, मजबूत ताळेबंद आणि कर्जमुक्त स्थितीमुळे फोर्स मोटर्स दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आकर्षक पर्याय ठरू शकते
Automobile Analysis: Force Motors Targets EV Expansion with ₹2,000 Crore Capex

Automobile Analysis: Force Motors Targets EV Expansion with ₹2,000 Crore Capex

Sakal

Updated on

भूषण ओक, शेअर बाजार विश्‍लेषक

फोर्स मोटर्स ही भारतातील एक अग्रगण्य वाहन कंपनी असून, तिची स्थापना १९५८ मध्ये स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योजक एन. के. फिरोदिया यांनी केली होती. ‘बजाज टेम्पो’ या नावाने २००५ पर्यंत ओळख असलेल्या या कंपनीची ‘टेम्पो’ आणि ‘मॅटॅडोर’ ही उत्पादने प्रसिद्ध होती. या कंपनीचे २००५ मध्ये ‘फोर्स मोटर्स’ असे नामकरण झाले. कंपनी प्रामुख्याने हलकी आणि मध्यम व्यावसायिक वाहने, युटिलिटी वाहने आणि इंजिननिर्मिती क्षेत्रात कार्यरत आहे. कंपनीचे ट्रॅव्हलर, मोनोबस, अर्बनिया, ट्रॅक्स आणि गुरखा असे पाच उपविभाग आहेत. हलक्या व्यावसायिक वाहनांच्या क्षेत्रात कंपनीचा जवळजवळ ७० टक्के बाजारवाटा असून, यामध्ये प्रवासी गाड्या, स्कूलबसेस, पोलिस व्हॅन, रुग्णवाहिका, डिलिव्हरी व्हॅन आणि इलेक्ट्रिक गाड्यांचा समावेश आहे. पिथमपूर, चेन्नई आणि पुणे येथे कंपनीचे उत्पादन प्रकल्प असून दहा हजारांहून अधिक कर्मचारी या कंपनीत काम करतात. कंपनी पंचवीसहून अधिक देशांमध्ये निर्यातही करते. कंपनीचे उत्पन्न प्रामुख्याने वाहनविक्री (७० टक्के महसूल) इंजिननिर्मिती (२५ टक्के महसूल) आणि सुटे भाग व सेवा (उर्वरित ५ टक्के महसूल) अशा तीन विभागांमधून येते.

वाहनविक्री विभागामध्ये ‘ट्रॅव्हलर’ बस, ‘ट्रॅक्स’ आणि ‘गुरखा’ या मॉडेलचा समावेश होतो. इंजिननिर्मिती विभागात कंपनी मर्सिडीज-बेंझ, बीएमडब्ल्यू आणि रोल्स रॉईससारख्या जागतिक कंपन्यांसाठी इंजिने बनवते. कंपनीचे संशोधन आणि विकास केंद्र पुणे येथे असून, कंपनी उत्पन्नाच्या सुमारे चार टक्के रक्कम संशोधन आणि विकासावर खर्च करते. या केंद्रात एक हजार अभियंते आणि शास्त्रज्ञ काम करतात.

भांडवली खर्च आणि विस्तार योजना

पुढील तीन वर्षांसाठी कंपनीने सुमारे २,००० कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाचे नियोजन केले आहे. यामध्ये ईव्ही प्लॅटफॉर्म अंतर्गत इलेक्ट्रिक ट्रॅव्हलर आणि प्रवासी वाहनांच्या विकासावर मोठा भर असेल. यासाठी निधी अंतर्गत स्त्रोतांमधून आणि कर्जाद्वारे उभा केला जाईल.

संभाव्य जोखमी

कच्च्या मालाच्या म्हणजे पोलाद आणि इतर धातूंच्या किमतींमधील चढ-उतार, टाटा मोटर्स आणि अशोक लेलँड यांसारख्या मोठ्या कंपन्यांकडून एलसीव्ही क्षेत्रात तीव्र स्पर्धा आणि इलेक्ट्रिक वाहनांकडे वेगाने वळणाऱ्या बाजारपेठेशी जुळवून घेण्याचे आव्हान या कंपनीसाठी काही प्रमुख जोखमी आहेत.

आर्थिक आकडेवारी (१५ मे २०२६) : तब्बल २६,८५१ कोटी रुपयांचे बाजारमूल्य असलेल्या या कंपनीची विक्री आणि निव्वळ नफा गेल्या पाच वर्षांमध्ये ३५ टक्के आणि ६६ टक्के चक्रवाढ दराने वाढले आहेत. आरओसीई आणि आरओई ३६.१ आणि २९.२ म्हणजे उत्तम आहेत. कंपनीने २०२६ मध्ये ९,०५७ कोटी रुपयांची विक्री आणि १,२१२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा दाखवला. कार्यचालन मार्जिन २०२४ ते २०२६ या काळात जवळजवळ दुप्पट होऊन आता १६ टक्के आहे. कंपनीने २०२२ आणि २०२३ मध्ये केलेल्या भांडवली गुंतवणुकीमुळे विक्री आणि नफ्यात उत्तम वाढ झाली आहे. कंपनीची रोख आवक समाधानकारक आहे आणि खेळत्या भांडवलाचे नियोजन उत्तम आहे. कंपनीच्या ६,५३८ कोटी रुपयांच्या मजबूत ताळेबंदात ९३० कोटी रुपये रोकड आणि गुंतवणुकीचा समावेश आहे. कंपनी कर्जमुक्त आहे.

मूल्यांकन : कंपनीचा शेअर सध्या २५.३ या पीई गुणोत्तराला उपलब्ध आहे. पाच वर्षांचा सरासरी पीई ३०.८ आहे. पीईजी ०.३८ आणि इव्हीइबिटा गुणोत्तर १६.३ आहेत. पिट्रोस्की गुणोत्तर आठ म्हणजे उत्तम आहे.

निष्कर्ष : नफावाढीचा विचार करता कंपनीचा शेअर वाजवी मूल्यांकनात उपलब्ध आहे. ही एक उत्तम कंपनी असून, गुंतवणूकदारांनी या कंपनीचा जरूर अभ्यास करावा.

(डिस्क्लेमर : हा लेख केवळ शैक्षणिक उद्दिष्टांसाठी असून, गुंतवणूकदारांनी प्रत्यक्ष गुंतवणुकीसाठी त्यांच्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अपेक्षित आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com