

Frontier Springs: A railway component player positioned for growth amid India’s railway and Vande Bharat expansion
Sakal
भूषण ओक, शेअर बाजार विश्लेषक
भारताच्या अर्थव्यवस्थेत रेल्वेचे अत्यंत महत्त्वाचे स्थान असून, गेल्या काही वर्षांपासून प्रत्येक केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत रेल्वेच्या मूल्यसाखळीतील काम करणाऱ्या कंपन्यांसाठी मोठ्या संधी निर्माण होत आहेत. फ्रंटियर स्प्रिंग्ज ही अशाच महत्त्वाच्या कंपन्यांपैकी एक आहे. ही कंपनी १९८१ मध्ये स्थापन झाली. ती रेल्वे डबे आणि मालवाहतूक वॅगन्ससाठी कॉइल स्प्रिंग्ज, एअर स्प्रिंग्ज, विविध फोर्ज्ड सुटे भाग तयार करते. यापैकी उच्च नफा देणाऱ्या एअर स्प्रिंग सस्पेन्शन विभागात कंपनीने २०२२ मध्ये जर्मनीच्या ‘कॉन्टिटेक’ आणि क्वांट-टेक्निक जीएमबीएच यांच्या तांत्रिक सहकार्याने प्रवेश केला. याशिवाय, कंपनीने स्वतः विकसित केलेल्या ‘फेल्युअर इंडिकेशन अँड ब्रेक ॲप्लिकेशन’ (फिबा) प्रणालीचे पेटंट मिळवले असून, फोर्जिंग उत्पादनासाठी सहा टन क्षमतेचा नवा हॅमरही कार्यान्वित केला आहे. या गुंतवणुकीमुळे आगामी काळात कंपनीसाठी नवे उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. कंपनीचे व्यवसाय मॉडेल तीन प्रमुख तांत्रिक स्तंभांवर आधारित असून, प्रगत उत्पादन तंत्रज्ञानावर केंद्रित आहे.