
डॉ. वीरेंद्र ताटके - गुंतवणूक विषयाचे अभ्यासक
वर्ष २०२४ मध्ये सोन्याने इतर गुंतवणूक पर्यायांवर मात करत गुंतवणूकदारांना उत्तम परतावा दिला. बँक मुदतठेव, पोस्ट ऑफिस गुंतवणूक योजना, पीपीएफ यांसारख्या पारंपरिक पर्यायांवर सोन्याने मात केलीच; पण तुल्यबळ समजल्या जाणाऱ्या शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड या प्रतिस्पर्ध्यांनादेखील परताव्याबाबतीत सोन्याने या वर्षात फार मागे टाकले. सोन्याची ही घोडदौड २०२५ मध्येदेखील तेवढीच वेगाने सुरू आहे. जगभरातील अस्थिरता, भारतीय शेअर बाजाराबाबत परदेशी गुंतवणूकदारांनी अलीकडील काळात घेतलेला आखडता हात, ट्रम्प प्रशासनाची सातत्याने बदलती धोरणे या आणि इतर संबंधित कारणांमुळे येणाऱ्या काळातही सोन्याकडे गुंतवणूकदारांचा ओढा कायम राहिल, असे तज्ज्ञांचे मत आहे.