
अॅड. महेश भागवत - ज्येष्ठ कर सल्लागार
वस्तू आणि सेवाकर अर्थात ‘जीएसटी’ करदाते अभय योजनेमुळे अतिशय आनंदी झाले होते. मात्र, जेव्हा प्रत्यक्षात कायद्यातील आवश्यक सुधारणा करून अभय योजना लागू करण्यात आली, तेव्हा या आनंदावर विरजण पडले. कारण, अभय योजनेसाठी कायद्यात अंतर्भूत केलेल्या शर्ती आणि अटी क्लिष्ट आणि संदिग्ध स्वरूपाच्या होत्या. केंद्रीय आणि राज्य वस्तू आणि सेवाकर खात्यातील अधिकाऱ्यांनी करदात्यांसाठी शिबिरे आणि चर्चासत्रे आयोजित करून याबाबत शंकानिरसन केले. तरीही, प्रत्यक्षात या योजनेचा फायदा घेताना करदात्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. मुळातच क्लिष्ट असलेल्या अभय योजनेच्या तरतुदींचा अधिकारी आपापल्या मर्जीनुसार अन्वयार्थ लावून करदात्यांना या योजनेपासून परावृत्त करत आहेत, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. करदात्याला अभय योजनेची सूट सहजासहजी मिळत नाही, हे वास्तव आहे.