

HDFC Small Cap Fund SIP performance
sakal
निखिल गिरमे- ‘ॲम्फी’ नोंदणीकृत म्युच्युअल फंड वितरक
गेल्या काही वर्षांत शेअर बाजारात गुंतवणूकदारांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. डी-मॅट खात्यांची वाढती संख्या आणि म्युच्युअल फंडांमधील गुंतवणुकीचा ओघ यामुळे भारताच्या दीर्घकालीन विकासगाथेवर गुंतवणूकदारांचा विश्वास अधिक दृढ होत असल्याचे दिसते. विविध फंड विभागांमध्ये, उच्च वाढीची क्षमता असलेल्या उदयोन्मुख कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांचा ओढा स्मॉल-कॅप फंडांकडे वाढला आहे. भारताच्या उदयोन्मुख उद्योगांची दीर्घकालीन वाटचाल आशादायक असली, तरी स्मॉल-कॅप विभागातील मूल्यांकन सध्या ऐतिहासिक सरासरीपेक्षा वरच्या पातळीवर आहे. अर्थात, मागील वर्षाच्या तुलनेत त्यात काही प्रमाणात नरमाई आली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी निवडक संधी उपलब्ध होत आहेत. मात्र, अस्थिरता आणि जोखीम अधिक असल्याने थेट स्मॉल-कॅप शेअरमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून गुंतवणूक करणे अधिक शहाणपणाचे ठरते.