

Investment in gold benefits
esakal
श्रीपाद जाधव
‘‘काळाच्या ओघात सोन्यातील गुंतवणुकीतून मिळालेल्या उत्कृष्ट परताव्यांवरून हे स्पष्ट होते, की भारतीय गृहिणी या जगातील सर्वांत हुशार फंड मॅनेजर आहेत,’’ अशा शब्दांत ज्येष्ठ बँकर उदय कोटक यांनी गृहिणींच्या आर्थिक दूरदृष्टीचे मुक्तकंठाने कौतुक केले आहे. कारण भारतीय गृहिणी थोडे का होईना सोने खरेदी करण्याची परंपरा पिढ्यानपिढ्या जपत आहेत. त्यातूनच त्यांनी ही संपत्ती निर्माण केली आहे. आज सोन्याचा भाव दीड लाखांवर गेल्यानंतर त्यांची ही आर्थिक दूरदृष्टी किती महत्त्वाची आहे, याची जाणीव होते. सध्या सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम दीड लाख रुपयांच्या पुढे पोहोचला असून, गेल्या अक्षय्य तृतीयेनंतर त्यात सुमारे ३० ते ३५ टक्क्यांची लक्षणीय वाढ झाली आहे. ही परिस्थिती लक्षात घेता, सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या भारतातील सर्वांत मोठ्या गुंतवणूकदार म्हणजेच गृहिणींना विशेष मानवंदना देणे योग्य ठरेल. कारण भारतातील गृहिणींकडे एकत्रितपणे सुमारे २५ हजार टन सोने आहे, जे जागतिक सोन्याच्या साठ्याच्या सुमारे ११ टक्के आहे. आज भारतातील कुटुंबांकडे एकत्रितपणे सुमारे २.५ लाख कोटी डॉलर किमतीचे सोने आहे. मात्र, या मौल्यवान संपत्तीच्या आर्थिक मूल्याचा किंवा उत्पादनक्षम वापर अजूनही पुरेशा प्रमाणात होत नाही.
‘पीडब्ल्यूसी’च्या २०२४ च्या अहवालानुसार, कुटुंबांकडे असलेल्या एकूण सोन्याच्या तुलनेत सुवर्णकर्जाचे प्रमाण केवळ ५.६ टक्के आहे. ही आकडेवारी पाहता, एवढ्या मोठ्या संपत्तीचा वापर अत्यंत मर्यादित असल्याचे स्पष्ट होते. योग्य नियोजन आणि वापर केल्यास ही संपत्ती भारताच्या ‘जीडीपी’मध्ये लक्षणीय योगदान देऊ शकते.