
सुधीर जोशी, sudhirjoshi२३@gmail.com
कालपर्यंत मध्यमवर्गात गणली जाणारी पिढी गेल्या काही वर्षांत ऐषारामाकडे झुकत चालली आहे. लक्झरी कार, हाय-एंड अपार्टमेंट, वर्षाकाठी एक-दोन परदेशवाऱ्या, परदेशी बनावटीची घड्याळे, क्लब मेंबरशिप, महागड्या शाळा व क्लासेस अशा अनेक गोष्टी ज्या काही वर्षापूर्वी जरूरी वाटत नव्हत्या, त्या आता गरजा झाल्या आहेत.
काही शतकांपूर्वी चैनी व विलासी जीवन ही राजेरजवाड्यांची मक्तेदारी होती. सोने, हिरे मोत्यांचे दागिने, सोन्या-चांदीची भांडी, सिंहासने, विलासी महाल, नोकरचाकर या गोष्टी त्यांची श्रीमंती दाखविण्याच्या पद्धती होत्या.
नंतर झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे श्रीमंतीची परिमाणे बदलली. रोल्सरॉइस गाड्या, खासगी विमाने यांची त्यात भर पडली. पूर्वापार सोने हे श्रीमंतीचे निदर्शक असले व सोन्याचे मूल्य आज टिकून असले, तरी ते श्रीमंतीचे प्रतीक म्हणून मिरवण्यात नव्या पिढीला फारसे स्वारस्य वाटत नाही.
सतराव्या शतकात ट्युलिप नावाचे साधे फुलदेखील श्रीमंतीचे प्रतीक बनले होते व लोक वेड्यासारखे त्याची शेती व व्यापार करण्यामागे लागले होते.
पण काही वर्षांतच त्याचा फोलपणा उघड होऊन त्याचे मूल्य घसरले व अनेक जण त्यात कफ्फलक झाले. श्रीमंतीची परिमाणे अशीच कायम बदलत असतात.