

Why Are IPOs Flooding the Market
esakal
पद्मनाभ वैद्य - padmanabh.mv@gmail.com
ऑगस्ट २०२६ मधील प्राथमिक समभाग विक्रीची अर्थात ‘आयपीओं’ची बरसात ही भारतीय भांडवली बाजारामधील वाढत्या उत्साहाची निदर्शक आहे. ऑगस्टमध्ये २० कंपन्यांनी
२१,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक पैसे उभारले असून, त्याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातही आणखी काही ‘आयपीओ’ येऊन गेले आहेत. त्याचबरोबर सप्टेंबरअखेरपर्यंत आणखी ३४ कंपन्यांचे जवळपास ४५,००० कोटी रुपयांचे शेअरप्रवाह बाजारात येण्याचे वृत्त आहे. सध्याच्या ‘आयपीओं’च्या गर्दीत गुंतवणूकदारांनी ‘कोणत्या ‘आयपीओ’ला अर्ज करायचा?’ या प्रश्नापेक्षा ‘कोणती कंपनी योग्य मूल्यांकनावर उपलब्ध आहे?’ हा प्रश्न विचारणे अधिक शहाणपणाचे ठरेल.
भारतीय भांडवली बाजारात ऑगस्ट २०२६ मध्ये प्राथमिक समभाग विक्रीची (आयपीओ) मोठी गर्दी पाहायला मिळाली. ऑगस्ट महिन्यातच सुमारे २० कंपन्यांनी पब्लिक इश्यूच्या माध्यमातून २१,००० कोटी रुपयांपर्यंत भांडवल उभारले. मागील सुमारे वर्षभरातील हा सर्वाधिक सक्रिय ‘आयपीओ’ महिना ठरला. यापूर्वी सप्टेंबर २०२५ मध्ये २५ पब्लिक इश्यू आले होते. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यातसुद्धा सुमारे ५ ते १० कंपन्यांनी ‘आयपीओ’ आणले होते. त्यांच्याकडून एकूण ३३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त भांडवल उभारले जाण्याची अपेक्षा आहे. यामध्ये मेनबोर्ड; तसेच एसएमई व्यवसायांचा समावेश आहे. तसेच बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा नॅशनल स्टॉक एक्स्चेंज अर्थात ‘एनएसई’च्या ‘आयपीओ’ला ‘सेबी’कडून लवकरच परवानगी मिळण्याची शक्यता आहे, असे ‘सेबी’चे अध्यक्ष तुहीन कांता पांडे यांनी म्हटले आहे. बाजारात येणाऱ्या या ‘आयपीओं’च्या मांदियाळीस प्रतिसाद देखील मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे. उपलब्ध शेअरच्या तुलनेत मागणी अनेक पटींमध्ये आहे. या वर्षीच्या सर्वाधिक लिस्टिंग नफा मिळवून देणाऱ्या पहिल्या दहा व्यवसायांचा सरासरी दर ५५ टक्के इतका आहे. अलीकडच्या काळात बाजारात पदार्पण करणारा टेंपसेन्स इन्स्ट्रूमेंट्स इंडियाच्या शेअरने पहिल्या दिवशी १०० टक्क्यांहून अधिक नफा देऊन या वर्षीचा नवा विक्रम नोंदविला. तसेच रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मुकेश अंबानी यांनी आणखी एका बहुचर्चित अशा ‘जिओ प्लॅटफॉर्म्स’च्या ‘आयपीओ’बद्दल घोषणा केली. मग या ‘आयपीओं’च्या गर्दीमागे नेमके काय कारण आहे? आणि गुंतवणूकदारांनी या उत्साहाकडे कसे पाहावे? यावर प्रकाश टाकणे आवश्यक आहे.