

Market Mood Index
esakal
प्रियांका कुलकर्णी - priyankakulkarni2201@gmail.com
शेअर बाजाराची अचूक वेळ साधून हाताळणे अत्यंत कठीण आहे. म्हणूनच बाजार कसा चालतो, हे समजून घेणे अधिक महत्त्वाचे ठरते. बाजार गुंतवणूकदारांच्या भावना (भय आणि लोभ) यावर चालतो, त्याला ‘मार्केट मूड’ म्हटले जाते. प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरन बफेट म्हणतात, ‘इतर लोक लोभी होतात तेव्हा सावध राहा, आणि इतर लोक घाबरलेले असतात तेव्हा संधी शोधा.’ शेअर बाजारात गुंतवणूक करताना, बाजाराचा ‘मूड’ समजायला लागला, तर हे निर्णय घेणे तुलनेने सोपे होऊ शकते.
अर बाजारातील गुंतवणूकदारांच्या भावनांचे प्रतिबिंब म्हणजे मार्केट मूड इंडेक्स. शेअर बाजार सध्या भीतीत आहे, की लोभात आहे, हे दाखवणारा एक संकेत. यामध्ये मुख्यतः चार टप्पे असतात-
१. खूप भीती : या टप्प्यात बाजारात मोठी घसरण झालेली असते किंवा सतत घसरण सुरू असते. बातम्यांमध्ये नकारात्मकता भरलेली असते; मंदी येणार, कंपन्यांचे निकाल खराब, जागतिक समस्या आदी. अशा वातावरणामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदार खूप घाबरतात. आपले नुकसान वाढू नये म्हणून घाईघाईने शेअर विकू लागतात, अगदी कमी भावातसुद्धा. अनेकदा चांगल्या आणि मजबूत कंपन्यांचे शेअरसुद्धा या भीतीमुळे स्वस्त मिळू लागतात; पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, सगळे जण विकत असताना विकणे सोपे असते; पण त्यावेळी शांत राहणे आणि योग्य शेअर ओळखून गुंतवणूक करणे हेच खऱ्या अर्थाने हुशारीचे लक्षण आहे. हा टप्पा अनुभवी गुंतवणूकदारांसाठी संधीचा असतो; पण नव्या गुंतवणूकदारांनी विचारपूर्वक आणि हळूहळू पावले टाकावी.
२. भीती : या टप्प्यात बाजार अजूनही पूर्णपणे सावरलेला नसतो; पण खूप मोठी घसरण थांबलेली असते. वातावरण अस्थिर असते. लोक पूर्णपणे घाबरलेले नसतात; पण आत्मविश्वासही नसतो. गुंतवणूकदार अजूनही सावध असतात. काहीजण अजून विक्री करतात, तर काहीजण थांबून परिस्थिती बघत असतात. या टप्प्यात बाजार हळूहळू स्थिर होऊ लागतो. दीर्घकालीन गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी हा टप्पा चांगल्या संधी निर्माण करू शकतो, कारण अजूनही भाव तुलनेने कमी असतात. मात्र, येथेही घाई न करता टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे जास्त सुरक्षित ठरते.