

MSME GST Compliance Guide
esakal
समीर दीक्षित
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) हे देशाच्या आर्थिक विकासाचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. महत्त्वाकांक्षी आणि प्रगतीशील असलेल्या या उद्योगांसमोर वस्तू आणि सेवा कर अर्थात ‘जीएसटी’ अनुपालनाची समस्या अजूनही मोठे आव्हान ठरत आहे. अत्याधुनिक डिजिटल सुविधा आणि सुधारित ऑनलाइन प्रणाली उपलब्ध असूनही, अनेक व्यवसाय अजूनही या प्रक्रियेत अडखळताना दिसतात. याचा परिणाम त्यांच्या प्रगतीवर जाणवतो. यावरील उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) व्यवसायांकडून कामाचा वेग वाढविण्याची अपेक्षा असताना, वस्तू व सेवा कर (जीएसटी) प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची होत चालली आहे. बहुतेक ‘एमएसएमई’ नियम टाळण्याचा प्रयत्न करत नाहीत, तर त्यांचे पालन योग्य पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, एकाच वेळी ग्राहक, पुरवठादार, साठा, रोख व्यवहार आणि व्यवसाय विस्तार सांभाळताना ‘जीएसटी’कडे दुर्लक्ष होते. ‘जीएसटी’शी संबंधित कामे शेवटच्या क्षणी म्हणजे ‘डेडलाइन’ जवळ आल्यावर किंवा नोटीस आल्यानंतर हाताळली जातात. तेव्हा सुरुवातीला झालेल्या छोट्या चुका मोठ्या समस्यांमध्ये रूपांतरित झालेल्या असतात.