
सी. आर. चंद्रशेखर - ‘धनलॅप’चे संस्थापक आणि सीईओ
आर्थिक नियोजनात म्युच्युअल फंड गुंतवणूक ही अतिशय महत्त्वाची मालमत्ता आहे. दीर्घावधीसाठी केलेल्या म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीमुळे संपत्तीनिर्मिती होते आणि आर्थिक सुरक्षाही मिळते. नियमित गुंतवणूक सुरू असताना आपत्कालीन प्रसंगामुळे पैशाची गरज भासू शकते. अशा वेळी वैयक्तिक कर्ज घेण्यापेक्षा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवरदेखील कर्ज घेता येते आणि त्याचा व्याजदरही तुलनेने कमी असतो.
भारतातील म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणारे कोणतेही निवासी भारतीय गुंतवणूकदार त्यांच्या म्युच्युअल फंडावर कर्ज मिळण्यास पात्र आहेत. ज्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना पैशांची नितांत गरज आहे; तसेच त्यांना त्यांचे म्युच्युअल फंड युनिट विकायचे नाहीत, अशा गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडाआधारे कर्ज मिळण्यासाठी अर्ज करावा. दीर्घकालीन संपत्तीवाढीला महत्त्व देणाऱ्या आणि आपल्या विशिष्ट उद्दिष्टांसाठी योजना आखलेल्या गुंतवणूकदारांनी त्यांच्या म्युच्युअल फंड युनिटची विक्री करू नये. आपल्या अल्प ते मध्यम मुदतीच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांनी त्यांच्या पोर्टफोलिओतील म्युच्युअल फंडावर कर्ज मिळण्यासाठी अर्ज करावा.