

Income Tax Return Filing
esakal
डॉ. दिलीप सातभाई - dvsatbhaiandco@gmail.com
नवा प्राप्तिकर कायदा १ एप्रिल २०२६ पासून लागू झाला असला, तरी आर्थिक वर्ष २०२५-२६ साठीचे प्राप्तिकर विवरणपत्र नेमके जुन्या की नव्या कायद्यानुसार दाखल करायचे, याबाबत अनेक करदात्यांमध्ये संभ्रम आहे. विशेषतः ‘आकारणी वर्ष’ आणि नव्याने आलेल्या ‘कर वर्ष’ या संकल्पनांतील बदलामुळे विवरणपत्र, फॉर्म, टीडीएस आणि दुरुस्ती प्रक्रियेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. संक्रमणकाळात कोणत्या उत्पन्नावर कोणता कायदा लागू होईल, हे समजून घेणे आता अत्यावश्यक ठरणार आहे.
१ एप्रिल २०२६ पासून लागू झाला असून, त्याचे सर्व स्तरांतून स्वागत झाले आहे. नवा कायदा अस्तित्वात आल्यानंतर प्राप्तिकर विवरणपत्र भरावयाचे हे पहिलेच वर्ष असल्याने यंदाचे प्राप्तिकर विवरणपत्र जुन्या की नव्या कायद्याअंतर्गत दाखल करायचे, या संभ्रमावस्थेत काही करदाते आहेत. ज्या वर्षासाठी उत्पन्न मिळविले, त्या वर्षाचा कायदाच आता अस्तित्वात नाही, तर नवा कायदा एक एप्रिल २०२६ नंतर मिळविलेल्या उत्पन्नावर प्राप्तिकर लागेल, असे स्पष्ट करतो, हा त्यांचा संभ्रम आहे. त्यामुळे २०२५-२६ वर्षात मिळविलेले उत्पन्न नव्याने परिभाषित केलेल्या कर वर्षात मिळविले नसल्याने संक्रमणकाळात करदात्यांना जुना आणि नवा कायदा कधी लागू होतो, हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
आर्थिक वर्ष २०२५-२६ चे प्राप्तिकर विवरणपत्र कोणत्या कायद्यानुसार भरायचे, कोणते फॉर्म वापरायचे आणि सुधारित/उशिराने/अद्ययावत (अपडेटेड) प्राप्तिकर विवरणपत्राबाबत कोणते नियम लागू होतील, हे स्पष्ट असणे गरजेचे आहे. पगारदार व इतर पात्र करदात्यांसाठी ३१ जुलैपूर्वी, तर ज्यांना लेखापरीक्षणाची आवश्यकता नाही अशा करदात्यांना ३१ ऑगस्टपूर्वी विलंबित शुल्काविना विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत आहे. यात पगारदारवर्ग व इतर करदात्यांना काही नवे बदल जाणवू शकतात. जुन्या आणि नव्या करप्रणालीतील बदल किंवा पर्याय निवडणाऱ्या करदात्यांना यंदा अधिक तपशीलवार माहिती द्यावी लागणार आहे.