

Investment Strategy Guide How Patience Helps Investors Navigate Market Volatility and Achieve Long Term Financial Goals
sakal
-निरंजन दांडेकर, शेअर बाजाराचे अभ्यासक
अवघ्या तीन ते चार आठवड्यांपूर्वी, नवरात्रीच्या सुमारास भारतीय शेअर बाजारांत प्रचंड घसरण सुरू होती. आठ ऑक्टोबर रोजी ‘निफ्टी’ २२,२३१ अंशांच्या नीचांकी पातळीवर आल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण होते. या भीतीपोटी अनेकांनी आपले पोर्टफोलिओ रिकामे केले, तर काहींनी ‘एसआयपी’ थांबविण्याचा निर्णय घेतला. मात्र, ज्या गुंतवणूकदारांनी या गोंधळात संयम राखून पुढील १० ते १५ वर्षांच्या दीर्घकालीन उद्दिष्टावर लक्ष ठेवून आणि शांत राहण्याचे धोरण (पॅसिव्ह इन्व्हेस्टिंग) स्वीकारले, त्यांच्यासाठी नोव्हेंबरचा पहिला आठवडा अनपेक्षित लाभ देणारा ठरला आहे. शेअर बाजारात तेजीचा झंझावात आला आणि ‘निफ्टी’ने जबरदस्त वेग पकडत २२,२३१ अंशांच्या तळापासून थेट २५,००० अंशांपर्यंत मजल मारली आणि अवघ्या एका आठवड्यात चक्क ११ टक्के परतावा दिला. यावरून बाजारात सातत्याने गुंतवणूक करत राहणे किंवा असलेली गुंतवणूक संयमाने राखून ठेवणे किती आवश्यक असते, हे लक्षात येते.