
Hindu Growth Rate : 'हिंदू ग्रोथ रेट' म्हणजे काय? ज्याबद्दल रघुराम राजन यांनी चिंता व्यक्त केली
Hindu Growth Rate : भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी हिंदू ग्रोथ रेट बाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. भारत धोकादायक पातळीच्या अगदी जवळ पोहोचला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
देशाच्या आर्थिक वाढीसाठी ही समस्या असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, खाजगी क्षेत्रातील मर्यादित गुंतवणूक, उच्च व्याजदर आणि जागतिक विकासाची संथ गती ही यामागची प्रमुख कारणे आहेत. (India is ‘dangerously close’ to Hindu rate of growth, says Raghuram Rajan)
'हिंदू ग्रोथ रेट' म्हणजे काय?
ही संज्ञा प्रत्यक्षात भारतीय आर्थिक विकास दराची निम्न पातळी दर्शवते. याचा प्रथम उल्लेख 1978 मध्ये झाला आणि भारतीय अर्थशास्त्रज्ञ राज कृष्णा यांनी कमी विकास दराचे वर्णन करण्यासाठी हा शब्द निवडला. पीटीआयच्या अहवालानुसार, 1950 ते 1980 पर्यंत भारताचा विकास दर सरासरी 4 टक्के होता.
स्वातंत्र्याच्या वेळी आर्थिक स्थिती कमकुवत होती :
1947 साली भारत स्वतंत्र झाला. त्या वेळी देशाची आर्थिक स्थिती अत्यंत कमकुवत होती. कृषिप्रधान देशात दारिद्र्य मोठ्या प्रमाणावर होते. यासोबतच पायाभूत सुविधांचा अभाव होता. त्यानंतरच्या दशकात देशाचा विकास दर अतिशय कमी होता.
देशाच्या अर्थव्यवस्थेच्या या संथ गतीला शब्दात व्यक्त करण्यासाठी हिंदू ग्रोथ रेट हा शब्द वापरला गेला. आताही हा शब्द देशाच्या कमी विकास दराचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो.
तिमाही आधारावर सतत घट :
रघुराम राजन यांनी गेल्या महिन्यात जाहीर केलेल्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (NSO) राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीच्या आधारे सांगितले की, तिमाही आधारावर विकास दरात सातत्याने घट होत आहे.
आकडेवारीनुसार, सकल देशांतर्गत उत्पादन (GPD) दुसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) 6.3 टक्के आणि पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) 13.2 टक्क्यांवरून तिसऱ्या तिमाहीत (ऑक्टोबर) फक्त 4.4 टक्क्यांवर घसरला.
गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा 5.2 टक्के होता. रघुराम राजन म्हणाले की, हे आकडे मोठ्या चिंतेचे कारण बनत आहेत.
माझी भीती चुकीची नाही, असे रघुराम राजन यांनी म्हटले आहे. सेंट्रल बँक (RBI) ने या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत 4.2 टक्क्यांपेक्षा कमी GDP वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे.
या टप्प्यावर, ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीची सरासरी वार्षिक वाढ 3 वर्षांपूर्वीच्या संबंधित कोरोनापूर्व तिमाहीच्या तुलनेत 3.7 टक्के आहे. ते म्हणाले की, विकासाचा हा वेग धोकादायकपणे आपल्या जुन्या 'हिंदू ग्रोथ रेट'च्या जवळपास आहे.