Friendship on social media led to new cyber crime fraud police action
Friendship on social media led to new cyber crime fraud police actionSakal

समाजमाध्यमांवरील मैत्री नवी सायबर गुन्हेगारी

एका नवरा-बायकोच्या जोडीने मुंबईतील एका वयस्कर महिलेशी समाजमाध्यमावरून मैत्री करत, घर बळकावण्याचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.

- शिरीष देशपांडे

आजकाल व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स अशा विविध समाज माध्यमांवर (सोशल मीडिया) अनेक मित्रमैत्रीणी असणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. यात प्रत्यक्षात भेटणारे, ओळखणारे लोक कमी असतात. आभासी जगतातील हे मैत्रीचे जाळे गुन्हेगारांना आयती संधी देत आहे.

अशाच एका नवरा-बायकोच्या जोडीने मुंबईतील एका वयस्कर महिलेशी समाजमाध्यमावरून मैत्री करत, घर बळकावण्याचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. ही घटना आभासी जगतात रमणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यांत अंजन घालणारी आहे.

वयस्कर महिलेवर मैत्रीचे गारुड

मुंबईतील एका उच्चभ्रू वस्तीत एकट्याच राहणाऱ्या एका ७० वर्षांच्या विधवा महिलेची समाजमाध्यमावरून एका महिलेची ओळख झाली. योगायोगाने या वयस्कर महिलेला ती नव्याने ओळख झालेली महिला सकाळी फिरायला जाताना भेटली.

या भेटीनंतर फोनवर संदेशांची देवाणघेवाण होऊ लागली. त्या अपरिचित महिलेने या एकट्या महिलेची सर्व माहिती नवऱ्याला सांगितली. त्यानंतर ते नवरा आणि बायको या वृद्ध महिलेच्या घरी तिला भेटायला आले.

एक एकर जागेवर असलेल्या एका मोठ्या बंगल्यातील अख्खा तळमजला त्या वृद्ध महिलेच्या ताब्यात होता. या गोष्टीचा फायदा घेण्याच्या हेतूने, या नवरा-बायकोने पद्धतशीरपणे या तिच्याशी मैत्री वाढवली. घरातील दुरुस्तीची कामे करून देऊन, वेळोवेळी मदत करून, तिचा विश्वास संपादन केला.

अचानक एक दिवस ही जोडी त्यांच्या राहत्या घराची दुरुस्ती सुरू आहे, असे निमित्त करून दोन दिवसांसाठी म्हणून राहायला आली आणि नंतर काही जायचे नाव काढेनात. या महिलेची दोन्ही मुले अमेरिकेत असतात, हे लक्षात आल्यावर, तर ते अधिकच निर्धास्तपणेे राहू लागले.

आज ना उद्या ते जातील असे वाटल्याने, या ज्येष्ठ महिलेने आपल्या मुलांना ही गोष्ट सांगितली नाही, तोपर्यंत त्या जोडीनेे पोटभाडेकरू असल्याची खोटी कागदपत्रेही तयार करून घेतली होती. मात्र, काही दिवसांनी त्या वयस्कर महिलेच्या नातेवाइकांच्या लक्षात ही गोष्ट आली.

त्यांनी परदेशात राहणाऱ्या मुलाला तातडीने भारतात बोलावून घेतले. त्या वयस्कर महिलेच्या मुलाने आणि नातेवाइक मंडळींनी पोलीस, वकील यांच्या मदतीने त्या जोडीला हुसकावून लावले. यात त्या महिलेची संपत्ती लुटली जाण्याचा, तिच्या जिवाचे बरे-वाईट होण्याचाही धोका होता.

सुदैवाने वेळीच तिच्या नातेवाइकांच्या लक्षात ही बाब आल्याने तिची सुटका झाली. मात्र, या सर्व प्रकाराचा ती वृद्ध महिला, मुले आणि नातेवाईक सर्वांनाच आर्थिक आणि मानसिक त्रास झाला.

समाजमाध्यमावरील अशा अचानक झालेल्या नव्या ओळखी कोठे पोहोचवू शकतात, याचे हे भयंकर उदाहरण आहे. अशाच फसवणुकीच्या अनेक घटना लग्न जुळविणाऱ्या वेबसाइट, डेटिंग साइटवरूनही घडत आहेत. त्यामुळे अशी मैत्री करताना सावध राहणे आवश्‍यक आहे.

ही घ्या काळजी...

  • अनेक वर्षे माहिती असलेल्या व्यक्ती आणि नवी ओळख झालेल्या व्यक्ती यांच्यात फरका करणे गरजेचे आहे. ओळख वाजवीपेक्षा अधिक वाढवली जात आहे, असे लक्षात येताच योग्य ती सावध धोरणे आखावीत.

  • समाजमाध्यमांवरील सर्व खात्यांसाठी योग्य सुरक्षा सेटिंग करून घ्यावे. उदा. फेसबुकवर आपले प्रोफाइल लॉक करावे म्हणजे माहिती सुरक्षित राहते.

  • आपण एकटे राहत असाल, तर बाहेर भेटणारे आणि समाजमाध्यमावर भेटणारे सर्व लोक फसवेगिरी करणारे असतील, असे समजून काळजीपूर्वक वागणे गरजेचे.

  • आपल्या जवळच्या एकट्या राहणाऱ्या सर्व व्यक्तींसाठी बाकीच्या लोकांनी सुरक्षा कवच तयार करणे गरजेचे आहे. उदा. आठवड्यातून एकदा त्या व्यक्तीची भेट घ्यावी. त्यांना आवश्‍यक ती मदत करावी.

असा प्रसंग आला तर...

https://cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवा.

चूक झाल्याचे लक्षात येताच ताबडतोब जवळच्या व्यक्तीला सांगून त्यातून बाहेर पडण्याची योजना आखा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com