Silicon Valley Bank : 1 पौंडमध्ये 'ही' कंपनी खरेदी करणार सिलिकॉन व्हॅली बँक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Silicon Valley Bank

Silicon Valley Bank : 1 पौंडमध्ये 'ही' कंपनी खरेदी करणार सिलिकॉन व्हॅली बँक

Silicon Valley Bank Latest Update :  अमेरिकेतील बँकिंग क्षेत्र मोठ्या संकटात आहे. आघाडीच्या बँकांमध्ये गणली जाणारी सिलिकॉन व्हॅली बँक गेल्या आठवड्यात बंद झाली. आता त्याचा परिणाम इतर अनेक क्षेत्रांवर होत आहे.

प्रभाव कमी करण्यासाठी उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. दरम्यान, सिलिकॉन व्हॅली बँकेचे ब्रिटीश युनिट (SVB UK Unit) अवघ्या एक पौंडात विकले जाणार आहे.

HSBC होल्डिंग्स सिलिकॉन व्हॅली बँकेचे ब्रिटिश युनिट विकत घेणार आहे. HSBC होल्डिंग्सने सोमवारी सांगितले की ते सिलिकॉन व्हॅली बँकेची ब्रिटिश उपकंपनी एका पौंडला खरेदी करणार आहे.

हा करार सिलिकॉन व्हॅली बँकेच्या ब्रिटिश ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्याचा प्रयत्न आहे. या करारानंतर, सिलिकॉन व्हॅली बँकेचे ब्रिटीश ग्राहक सामान्य बँकिंग सुविधांचा वापर करू शकतात.

एचएसबीसीचे मुख्य कार्यकारी नोएल क्विन यांनी या कराराबद्दल सांगितले की, ''बँकेच्या ब्रिटीश व्यवसायासाठी याचे मोठे धोरणात्मक महत्त्व आहे. (HSBC acquires Silicon Valley Bank UK unit for 1 pound)

हा करार व्यावसायिक बँकिंग फ्रँचायझी मजबूत करेल आणि नाविन्यपूर्ण आणि वेगाने वाढणाऱ्या कंपन्यांच्या गरजा पूर्ण करण्यात मदत करेल'' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नोएल क्विन यांनी सिलिकॉन व्हॅली बँकेच्या ब्रिटीश ग्राहकांचे केले स्वागत :

नोएल क्विन पुढे म्हणाले, ''आम्ही SVB च्या UK ग्राहकांचे HSBC मध्ये स्वागत करतो आणि त्यांना UK आणि जगभरात वाढण्यास मदत करण्यास उत्सुक आहोत'' SVB चे UK ग्राहक पूर्वीप्रमाणेच सामान्य बँकिंगचा आनंद सुरू ठेवू शकतात.

तसेच, ते खात्री बाळगू शकतात की त्यांच्या ठेवी आता HSBC मध्ये सुरक्षित आहेत. आम्ही HSBC मध्ये SVB UK सहकाऱ्यांचे स्वागत करतो आणि त्यांच्यासोबत जवळून काम करण्यास उत्सुक आहोत"

सिलिकॉन व्हॅली बँकेच्या ब्रिटीश युनिटच्या विक्रीची ही बातमी अशा वेळी समोर आली आहे जेव्हा अमेरिकन सरकार आणि बँकिंग अधिकारी या बँकेच्या बुडण्याचा परिणाम मर्यादित करण्याचा प्रयत्न करत आहेत.

यूएस सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हने याबाबत यापूर्वी अनेक बैठका घेतल्या आहेत. खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेनही या प्रकरणाची माहिती घेत आहेत.

HSBC नुसार, 10 मार्चपर्यंत, सिलिकॉन व्हॅली बँक यूके लिमिटेडचे ​​सुमारे 5.5 अब्ज पौंड कर्ज होते, तर बँकेकडे सुमारे 6.7 अब्ज पौंड ठेवी होत्या.

लवकरच हा करार पूर्ण करणार असल्याचे एचएसबीसीने म्हटले आहे. SVB UK च्या मूळ कंपनीची मालमत्ता व्यवहारातून वगळण्यात आली आहेत.