

स्मार्ट सल्ला
विक्रम अवसरीकर,फायनान्शियल प्लॅनर
अलीकडच्या काळात आर्थिक गुंतवणूक विश्वात ‘पीएमएस’ हा शब्द प्रचलित झाला आहे. अनेकजण याचा उल्लेख करताना दिसतात. मात्र, सर्वांनाच याचा नेमका अर्थ माहित असतो, असे नाही. ही संकल्पना समजावून सांगण्याचा प्रयत्न या संवादातून केला आहे.
‘पीएमएस’ म्हणजे रे काय भाऊ?
‘‘अरे, ‘पीएमएस’ म्हणजे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिस. ही एक प्रकारची गुंतवणूक सेवा आहे, ती घेतली, की आपल्याला आपण कोणीतरी खास असल्यासारखे वाटते.’’
‘‘खास असल्यासारखे म्हणजे काय रे भाऊ?’’
‘‘‘पीएमएस’मध्ये पन्नास लाख रुपये एकरकमी असतील, तरच गुंतवता येतात. हे पैसे ‘पीएमएस’वाल्या कंपन्या वेगवेगळ्या शेअरमध्ये गुंतवतात; तसेच ते ‘फ्युचर ऑप्शन्स’मध्ये गुंतवू शकतात.’’
‘‘आपले पैसे त्या स्वतःच्या मनाप्रमाणे वापरतात का रे भाऊ?’’
‘‘नाही रे! त्या कंपन्या आपल्याला पर्याय देतात, की तुमचा पोर्टफोलिओ कसा पाहिजे ते सांगा किंवा आम्ही आमच्या पद्धतीने पैसे तुमच्यासाठी गुंतवतो.’’
‘‘हे पैसे त्या कसे गुंतवतात रे भाऊ?’’
‘‘आपले पैसे या कंपन्या आपल्याच डी-मॅट खात्यातून व्यवहार करून गुंतवतात. कधी कधी आपल्याला नवे डी-मॅट खाते उघडावे लागते आणि त्याची किल्ली त्यांना द्यावी लागते.’’
‘‘हे पैसे गुंतवताना त्या आपल्याला प्रत्येक वेळी विचारतात का रे भाऊ?’’
‘‘त्यांना आपण खुली सूट दिली, तर त्या आपल्याला कशाला विचारतील?’’
‘‘मार्केट वर असताना सगळे पैसे एकरकमी एकाच वेळी गुंतवले जातात का रे, भाऊ?’’
‘‘आपण त्यांना एकरकमी पन्नास लाख दिले, की आपले घड्याळ चालू होते. आपण त्यांना जे आधी सांगितले आहे त्याप्रमाणे त्या वागतात.’’
‘‘डी-मॅटमधून व्यवहार करतात म्हणजे त्याचे पैसे आपणच द्यायचे का रे भाऊ?’’
‘‘हो, रे! ते पैसे आपल्याला द्यावे लागतात.एवढेच नव्हे, तर आपण पैसे दिले, की सुरुवातीला त्यांची प्रशासकीय फी ते कापून घेतात. शिवाय आपल्याला फायदा झाला, तर एका ठराविक टक्क्यानंतर त्यातलेही काही पैसे ते घेतात.’’
‘‘अरे बापरे ! ‘सेबी’तले दादा याकडे बघत नाहीत का रे भाऊ?’’
‘‘‘सेबी’तल्या दादांनी या कंपन्यांसाठी काही नियमच आखलेले नाहीत. पैसे तर सोडून द्या; पण आपण त्यांना खुली सूट दिली असेल, तर ते कधीही आपले नियोजन बदलवू शकतात.’’
‘‘अरे, मग मध्येच कोणाला पैसे लागले, तर मग कसे काय रे भाऊ?’’
‘‘कोणाला मध्येच पैसे लागले, तर मग जबरदस्त दंड देऊनच बाहेर जायचे दार उघडले जाते. शिवाय आलाच आहात, तर लगेच बाहेरही पडता येत नाही. काही वेळानेच दार उघडते.’’
‘‘एवढे सगळे करतात, तर पैसे तरी नीट कमावून देतात का रे ,भाऊ?’’
‘‘तीच मोठी गंमत आहे रे! कोणाला विचारायचे, की कोणाच्या तुलनेत किती पैसे मिळाले? या कंपन्यांचा ठराविक असा कोणताही निकष नाही आणि प्रत्येक कंपनीची प्रत्येक योजना वेगळी, तुलना कशी करणार?’’
‘‘अरे बाप रे! मग लोक यांच्याकडे पैसे का देतात रे भाऊ?’’
‘‘लोकांकडे जास्तीचे पैसे असले, की त्यांना वाटते सोपे सोपे उपाय चालत नाहीत. काहीतरी धाडस केले, की खास वाटते. किती तरी लोक साध्यासोप्या योजना आखून गुंतवणूक करताना दिसतात. त्यांच्याकडे आपल्या इतके पैसे नाहीत या विचाराने लोक इकडे येतात.’’
‘‘तू पण पैसे गुंतवले होतेस ना यात, भाऊ?’’
‘‘छे बुवा ! मी हळूहळू सातत्याने गुंतवणूक करतो. शिवाय एकालाच पन्नास लाख रुपये देण्यापेक्षा माझे पैसे मी विखरून गुंतवतो.’’
‘‘मी पण यावर नक्की विचार करेन.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.