SIP : ‘एसआयपी’ २० हजार कोटींपार; खात्यांच्या संख्येचाही ८.७० कोटींचा उच्चांक

एप्रिलमध्ये म्युच्युअल फंडांतील सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात ‘एसआयपी’द्वारे होणाऱ्या गुंतवणुकीने २०,३१७ कोटी रुपयांची सार्वकालिक उच्चांकी पातळी गाठली आहे.
SIP
SIPSakal

मुंबई : एप्रिलमध्ये म्युच्युअल फंडांतील सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात ‘एसआयपी’द्वारे होणाऱ्या गुंतवणुकीने २०,३१७ कोटी रुपयांची सार्वकालिक उच्चांकी पातळी गाठली आहे. ‘एसआयपी’ गुंतवणुकीने अवघ्या दीड वर्षात दुप्पट वाढ नोंदवली आहे.

सप्टेंबर २०२२ मध्ये ‘एसआयपी’द्वारे म्युच्युअल फंडातील योगदान १० हजार कोटी रुपये होते. ‘एसआयपी’ खात्यांची संख्याही ८.७० कोटींच्या उच्चांकावर पोहोचली आहे, अशी माहिती असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाने (अॅम्फी) आज जारी केलेल्या अहवालात दिली आहे.

मार्चमध्ये ‘एसआयपी’द्वारे १९,२७० कोटी रुपये गुंतवणूक झाली होती, आणि गेल्या वर्षी याच काळात ती १३,७२८ कोटी रुपये होती. ‘एसआयपी’ खात्यांची संख्या मार्च २०२४ मधील ८.३९ कोटींच्या तुलनेत एप्रिल २०२४ मध्ये ८.७० कोटींच्या उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे.

एप्रिलमध्ये नव्या ‘एसआयपीं’ची संख्या ६३ लाख ६४ हजार ९०७ असून, म्युच्युअल फंड फोलिओदेखील एप्रिलमध्ये १८.१४ कोटींच्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचले आहेत. म्युच्युअल फंडाची ‘एसआयपी’द्वारे व्यवस्थापनाखाली असलेली मालमत्ता (एयूएम) एप्रिलमध्ये ११ लाख २६ हजार १२८ कोटी रुपये होती,

मार्चमध्ये ती १० लाख ७१ हजार ६६५ कोटी रुपये होती. म्युच्युअल फंडांची एप्रिलमध्ये व्यवस्थापनाखालील सरासरी मालमत्ता ५७ लाख एक हजार ३५८ कोटी रुपयांची आहे, मार्चमध्ये ती ५५ लाख ७२७ कोटींची होती. सुमारे ९३ टक्के म्युच्युअल फंड खात्यांमध्ये ‘केवायसी’ प्रमाणीकृत किंवा नोंदणीकृत स्थिती आहे. केवळ तीन टक्के खात्यांची ‘केवायसी’ ‘होल्ड’ स्थितीत आहे, असेही ‘अॅम्फी’च्या अहवालात म्हटले आहे.

एप्रिलमध्ये इक्विटी फंडांमध्ये एकूण १८,९१७ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून, मार्चमधील २२,६३३ कोटी रुपयांवरून त्यात थोडी घसरण झाली आहे. गुंतवणूकदारांनी पुन्हा स्मॉल-कॅप आणि मिड-कॅप फंडांवर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून आले असून,

थीमॅटिक फंडांनंतर मल्टी-कॅप फंडांमध्ये २७२३ कोटी रुपयांची दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक गुंतवणूक झाली आहे. थीमॅटिक फंडामध्ये सर्वाधिक ५,१६६ कोटी रुपयांचा ओघ आला. मार्चमध्ये २१२८ कोटी रुपयांच्या आसपास मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणाऱ्या लार्ज-कॅप फंडांमध्ये एप्रिलमध्ये केवळ ३५७ कोटी रुपये आले आहेत.

स्मॉल-कॅप फंडांमध्ये २,२०८ कोटींची गुंतवणूक झाली, तर मिड-कॅप फंडातील गुंतवणूक १,७९३ कोटी रुपये होती. मल्टी-कॅप फंडात २,७२३ कोटी रुपये, तर लार्ज आणि मिड कॅप फंडांमध्ये २,६३८ कोटींचा ओघ आला. हायब्रीड फंड श्रेणींमध्ये मार्चमधील ५,५८३ कोटी रुपयांच्या तुलनेत १९,८६२ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.

डेट म्युच्युअल फंड योजनांमध्ये एक लाख ८९ हजार ८९० कोटी रुपयांचा भरीव ओघ दिसून आला, त्यापैकी एक लाख दोन हजार ७५१ कोटी रुपयांची गुंतवणूक लिक्विड फंडात झाली.

म्युच्युअल फंड उद्योगाने नवे उच्चांक नोंदवले आहेत. ‘एसआयपी’द्वारे होणाऱ्या गुंतवणुकीने ऐतिहासिक २० हजार कोटींचा टप्पा पार केला आहे, तर फंडाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता ५७.२६ लाख कोटींवर पोहोचली आहे. ही आनंदाची बाब आहे. ‘केवायसी’ नियमांच्या संदर्भात ही प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी म्युच्युअल फंड उद्योग प्रयत्नशील आहे. त्यामुळे म्युच्युअल फंडातील गुंतवणूक सुलभ आणि अखंडित राहील.

- वेंकट चालसानी,मुख्य कार्यकारी अधिकारी अॅम्फी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com