‘निफ्टी’ होणार ‘सेन्सेक्स’?

गेल्या काही वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था मजबूत होत आहे. भारतीय अर्थव्यवस्था आता जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्यास सज्ज होत आहे.
Sensex Nifty
Sensex Niftysakal

गेल्या काही वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था मजबूत होत आहे. भारतीय अर्थव्यवस्था आता जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्यास सज्ज होत आहे. त्यादृष्टीने वाटचाल सुद्धा चालू आहे. याच वाटचालीचे पडसाद शेअर बाजारात पाहायला मिळत आहेत.

गेल्या दोन दशकांपासून भारतीय शेअर बाजाराने जी तेजीची वाटचाल चालू केली आहे ती अजूनही चालू आहे आणि या पुढेही अजून बरीच वर्षे चालू राहील, यात शंका वाटत नाही. २००३ मध्ये ‘निफ्टी’ हा निर्देशांक ९५० अंशांवर होता, जो आता २२,००० अंशांच्या पुढे गेला आहे. म्हणजे गेल्या २० वर्षांत साधारण २३ पटीहून अधिक वाढ झाली आहे. पण या काळात शेअर बाजारात खूप चढ-उतारही आपण पाहिले.

२००८ आणि २०२० मध्ये आलेले मोठे ‘करेक्शन’ही बघितले. २००९ ते २०१४ या काळात शेअर बाजाराच्या निर्देशांकाने परतावा दिला नाही. हा काळ गुंतवणूकादारांसाठी खूपच कठीण होता. तरी सुद्धा जर आपण दीर्घावधीचा परतावा बघितला, तर तो २३ पट म्हणजे साधारण १७ टक्के सरासरी वार्षिक परतावा आहे. पण या परताव्याचा खरोखर किती गुंतवणूकदारांना फायदा झाला?

माझ्या मते, असा फायदा झालाच नसेल आणि याचे एकमेव कारण म्हणजे संयमाचा अभाव. ज्या गुंतवणूकदारांनी काही वर्षांपूर्वी म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली असेल, त्यातील किती गुंतवणूकदारांनी ती अजूनही तशीच ठेवली आहे? एकतर, काही आर्थिक गरजांमुळे विकली असेल किंवा शेअर बाजारात येणाऱ्या ‘करेक्शन’ला घाबरून विकली असेल. पण आता येथून पुढे अशी चूक करू नये, असे सांगावेसे वाटते.

भारतीय शेअर बाजारात यापुढेही तेजीचे वातावरण चालू राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याची कारणे पुढीलप्रमाणे -

1) केंद्र सरकारची अर्थव्यवस्था मजबुतीसाठी असलेली धोरणे.

2) शेअर बाजाराकडे सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा वाढता कल.

3) म्युच्युअल फंडाद्वारे शेअर बाजारात दरमहा येणारी विक्रमी गुंतवणूक.

4) चीनमधील डगमगत्या अर्थव्यवस्थेमुळे परकी गुंतवणूकदारांचा भारतीय अर्थव्यवस्थेकडे वाढणारा ओघ.

5) जगातील सर्वांत जास्त वेगाने वाढणारी भारतीय अर्थव्यवस्था.

अशा अनेक कारणांमुळे आपल्या शेअर बाजारात तेजीचे वातावरण कायम राहील, यात शंका वाटत नाही. गेल्या २० वर्षांत ‘सेन्सेक्स’ आणि ‘निफ्टी’ची वाटचाल कशी राहिली, हे सोबतच्या तक्त्यावरून कळेल आणि पुढील १० वर्षांत काय होऊ शकते, याचाही अंदाज येईल.

वर्ष - ‘निफ्टी’ पातळी - ‘सेन्सेक्स’ पातळी

२००४ - २००० - ६५००

२०१४ - ६५०० - २२,०००

२०२४ - २२,००० - ७३,०००

२०३४ - ७२,०००? - २,३५,०००?

सोबतच्या तक्त्यावरून आपल्याला असे दिसते, की गेल्या दोन दशकात दर १० ते ११ वर्षांनी ‘निफ्टी’ची पातळी ही ‘सेन्सेक्स’ची पातळी झाली आहे. मग २०३४ ते २०३५ पर्यंत ‘निफ्टी’ आणि ‘सेन्सेक्स’ची तक्त्यात दिलेली पातळी यायची शक्यता जास्त आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आपापल्या म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीतून कमीतकमी पुढची १० ते १२ वर्षे तरी बाहेर पडू नये. असा संयम ठेवला तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्यांकन किती मोठ्या प्रमाणात वाढू शकते, ते लक्षात येईल.

(डिस्क्लेमर : म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करण्यापूर्वी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत आणि यासंदर्भात तज्ज्ञ सल्लागाराची मदत घेणे हिताचे ठरते.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com