प्रवासातील ‘प्रीपेड’ सुविधा

प्रत्येकाला आयुष्यात कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रवास करावाच लागतो. प्रवास हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. बस, रेल्वे, लोकल ट्रेन, मेट्रो, बोट, मोटार, स्कूटर, सायकल अशा विविध वाहनांनी आपण गरजेनुसार प्रवास करीत असतो.
public transport system prepaid wallet facility rbi
public transport system prepaid wallet facility rbi Sakal

प्रत्येकाला आयुष्यात कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रवास करावाच लागतो. प्रवास हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. बस, रेल्वे, लोकल ट्रेन, मेट्रो, बोट, मोटार, स्कूटर, सायकल अशा विविध वाहनांनी आपण गरजेनुसार प्रवास करीत असतो.

या प्रवासामध्ये आपल्याला तिकीट घ्यावे लागते किंवा टोल भरावा लागतो किंवा पार्किंगसाठी पैसे द्यावे लागतात. अशा प्रत्येक ठिकाणी पैसे देण्याची (पेमेंट) पद्धत वेगळी असते. यामुळे बऱ्याचदा गैरसोय व वेळ जातो. यावर पर्याय म्हणून रिझर्व्ह बँकेने सार्वजनिक वाहतूक प्रणालीसाठी (पब्लिक ट्रान्स्पोर्ट सिस्टिम) प्रीपेड वॉलेट सुविधा सुरू केली आहे.

सुरवातीला या सुविधेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. कारण बँका किंवा बिगरबँकिंग वित्तीय संस्था (एनबीएफसी) यांना असे वॉलेट देण्यापूर्वी ग्राहकांची ‘केवायसी’ पूर्तता करून घेणे बंधनकारक होते.

या प्रीपेड वॉलेटमध्ये लोक साधारणत: दोन ते तीन हजार रुपये इतकी अल्प रक्कम ठेवत किंवा अशा छोट्या रकमांचे रिचार्ज करत, त्यामुळे ग्राहकांना एवढ्या छोट्या रकमेसाठी ‘केवायसी’ पूर्तता करणे जिकीरीचे वाटू लागले. ही अडचण लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेने ही अट शिथिल केली. बँका, ‘एनबीएफसी’ यांना ३,००० रुपयांच्या रकमेपर्यंत ‘केवायसी’ न करता प्रीपेड वॉलेट देण्याची परवानगी दिली.

त्यामुळे ग्राहकांची आणि बँका, ‘एनबीएफसीं’चीही मोठी अडचण दूर झाली. त्यामुळे या प्रीपेड वॉलेटचा वापर वाढण्यास चालना मिळाली. या वॉलेटचा वापर करून भारतभर कोठेही तिकीट काढता येते; तसेच पार्किंग, टोल यासाठीही पेमेंट करता येते. रिझर्व्ह बँकेने अट शिथिल केल्यामुळे अधिकाधिक लोकांना या उत्तम सुविधेचा लाभ घेणे शक्य झाले आहे.

प्रीपेड वॉलेटची वैशिष्ट्ये

  • या प्रीपेड वॉलेटला ‘पीपीआय-एमटीएस’ (प्रीपेड इन्स्ट्रुमेंट्‍स फॉर मास ट्रान्स्पोर्ट सिस्टीम) असे म्हणतात.

  • याचा वापर केवळ प्रवासाचे तिकीट, टोल व पार्किंग पेमेंट करण्यासाठीच करता येतो. अन्य कोणतेही पेमेंट याने करता येत नाही.

  • या वॉलेटमध्ये पेमेंट अापोआप केले जाईल, असे ॲप्लिकेशन असते.

  • ‘केवायसी’ नसेल, तर वॉलेटमध्ये ३००० रुपयांपर्यंतच शिल्लक ठेवता येते.

  • वॉलेटमधील शिल्लक रक्कम संपली किंवा ३००० रुपयांपेक्षा कमी झाली, तर ३००० रुपयांपर्यंत कधीही रिचार्ज करता येते.

  • यातील शिल्लक रक्कम काढता येत नाही; तसेच परत मिळत नाही किंवा ट्रान्स्फर करता येत नाही.

  • या वॉलेटचा वापर देशभर कोठेही करता येतो.

  • थोडक्यात, आपल्या मोबाइलमध्ये असे वॉलेट असल्याने प्रवासातील सुविधा निश्चितच वाढणार आहेत.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com