वाटचाल शेअर बाजाराची

आकाशपाळण्यात बसल्याची जाणीव नक्कीच लहान मोठ्या गुंतवणूकदारांना झाली असेल.
share market after result of lok sabha election investor finance
share market after result of lok sabha election investor financeSakal

- भूषण महाजन

गेल्या सप्ताहात शेअर बाजारात मोठीच धुमश्‍चक्री बघायला मिळाली. निकालाचे कौल बघून विक्रमी तेजी अनुभवलेल्या अल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांना प्रत्यक्ष निकालानंतर बसलेला धक्का व अपेक्षाभंग, यामुळे चार जूनला शेअरबाजार कोसळला. भाजपाला स्वबळावर बहुमत मिळाले नसल्याने मित्रपक्षांबरोबर स्थापन झालेले सरकार स्थिर राहील का?

हा मुख्य कळीचा मुद्दा होता. मात्र, सहकारी पक्षाचे नेते नितीशकुमार व व्यंकय्या नायडूंनी निर्विवाद पाठिंबा जाहीर करताच बाजार लगेच सावरला. युवराजसिंगच्या विक्रमी एका षटकातील सहा षटकारांप्रमाणे बाजारानेही ५, ६ आणि ७ जून असे तिन्ही दिवस तेजीची नवनवी उड्डाणे नोंदवली.

आकाशपाळण्यात बसल्याची जाणीव नक्कीच लहान मोठ्या गुंतवणूकदारांना झाली असेल. शेवटी सप्ताहाअखेर ‘सेन्सेक्स’ ७६,६९३ च्या नव्या उच्चांकावर बंद झाला, तर ‘निफ्टी’ने २३२९० च्या नव्या उच्चांकाला स्पर्श केला.

तेव्हा विचलित न होता भारतावर भिस्त ठेवलेल्या भारतीय गुंतवणूकदारांसाठी हा अर्थव्यवस्थेने दिलेला तोहफा ऊर्फ नजराणाच आहे; तसेच भारतीय मतदारांनीदेखील सर्वांना साथीला घेऊन राज्यकारभार करा, हा राज्यकर्त्यांना दिलेला संदेश आहे.

बाजाराची वाटचाल

पुढील पाच वर्षांत सरकार कृषी, शेतकरी, शेतमालाचे आयात-निर्यात धोरण यावर खास लक्ष देऊन त्या क्षेत्रातील नाराजी कमी करेल, अशी अपेक्षा आहे. विकासाच्या मार्गावरून मागे हटणार नाही, सर्वसंमतीनेच निर्णय घेईन, ही ग्वाही पंतप्रधानांनी दिली आहे. बाजाराने सार्वकालिक उच्चांक केलेलाच आहे.

डोंगर चढतांना धाप लागून आपण जसे थोडे थांबतो, तसा शेअर बाजार कदाचित थोडा खालीही येऊ शकेल; पण पुढील वाटचाल तेजीचीच असेल असे दिसते. अर्थात, अर्थसंकल्पामध्ये काही जाचक करतरतुदी येऊ नयेत ही अपेक्षा आहे. ‘निफ्टी’सह सर्वच क्षेत्रीय निर्देशांक वर गेले असले, तरी वाहन उद्योगाने नवी भरारी घेतली आहे.

चांगल्या मॉन्सूनची अपेक्षा आहे, त्यातून ग्रामीण भागातून नवी मागणी येऊ शकते. रिझर्व्ह बँकेची बैठक नुकतीच पार पडली. व्याजदरात कोणताही बदल नाही. परंतु, चालू आर्थिक वर्षात विकासदर वाढून ७.२ टक्के होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. कॅनडा, स्वीडन, स्वित्झर्लंडपाठोपाठ युरोपियन मध्यवर्ती बँकेने पाव टक्क्याने व्याजदर कमी केले आहेत.

खरेदीची संधी

‘उडदामाजी काळे गोरे, काय निवडावे निवडणारे’ या उक्तीप्रमाणे हिरो, टीव्हीएस, महिंद्रा, मारुती, उनोमिंडा सारेच आकर्षक वाटतात. कोणता शेअर घ्यावा, हा प्रश्न पडत असेल तर हे सर्व शेअर समविष्ट असलेला ‘ऑटोबीस’ नावाचा ‘ईटीएफ’ आहे. तो सध्या २५० रुपयांच्या आसपास आहे. किमान वर्षभर सांभाळता येईल. ग्रामीण क्षेत्रावर अवलंबून असलेले ॲग्रो केमिकल क्षेत्रही उभारी घेऊ शकते.

आज ना उद्या मोबाईलचे दरही वाढतीलच. चालू वर्षी किमान २० रुपयांनी सरासरी महसूल वाढावा असे ‘भारती एअरटेल’ने सूचित केले आहेच. यावेळी त्यात रिलायन्सही सामील होईल कारण ‘सिक्स-जी’ साठी भांडवल लागेल; तसेच ‘फाइव्ह-जी’ डेटा आज मोफत आहे. मोबाइल ग्राहकाला डेटा वापरायची सवय लागली आहे, त्यासाठी पैसे मोजावे लागतील. अंदाजे २५ ते ४० हजार कोटी रुपयांचा नवा महसूल त्याद्वारे मोबाइल कंपन्यांना मिळेल. या साऱ्या शक्यता प्रत्यक्षात आल्या, तर हे क्षेत्र चमकून उठेल.

आपण एका दिवसासाठी पैसे गुंतवत नाही याची सतत आठवण ठेवणे आणि भारतीय अर्थव्यवस्था व नेतृत्व यावर विश्वास ठेऊन घसरणीमध्ये न घाबरता चांगल्या शेअरची खरेदी करणे आणि ती सांभाळणे यातूनच समाधान व संपत्ती मिळू शकते.

(डिस्क्लेमर : शेअर बाजारातील गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com