
- डॉ. आनंद साठे
प्रत्येक गुंतवणूकदार जेव्हा गुंतवणुकीचा विचार करतो तेव्हा त्याच्या मनात त्याच्या पसंतीचे पर्याय आधी येतात. उच्च परताव्यासाठी उच्च जोखीम घेण्यास तयार असलेले गुंतवणूकदार इक्विटी अर्थात शेअर बाजाराला पसंती देतात. काहींची पसंती म्युच्युअल फंडाला, तर काहींची सोन्यातील गुंतवणुकीला असते.
काही लोकांना जमीन, घर, फ्लॅट अशा स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करणे आवडते. मात्र, सर्व अंडी एकाच टोपलीत ठेवू नयेत, हे यशस्वी गुंतवणुकीसाठी महत्त्वाचे सूत्र आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे आपली वैयक्तिक पसंती ठराविक पर्यायाला असली, तरी उत्तम पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी त्यात वैविध्य जपणे आवश्यक आहे.
गुंतवणुकीचे धोरण
बहु-मालमत्ता गुंतवणुकीच्या धोरणानुसार, जोखमींचा पूर्ण विचार करून एक संतुलित आणि सुव्यवस्थित पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी अनेक मालमत्ता वर्गांमध्ये निधीचे वाटप केले जाते. एकाच मालमत्ता वर्गातील गुंतवणुकीमुळे निर्माण होणारी जोखीम कमी करण्यावर यात भर दिला जातो. विविध मालमत्तांमधून संभाव्य परताव्याचाही विचार केला जातो. अशा पोर्टफोलिओमध्ये शेअर, कर्जरोखे, सोने, चांदी, आरईआयटीएस आदी पर्यायांचा समावेश होतो.
जोखीम आणि परतव्यात संतुलन
बहु-मालमत्ता गुंतवणुकीमागील तर्कशुद्धता अतिशय साधी आणि स्पष्ट आहे. विविध मालमत्ता वर्गांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही एकूण पोर्टफोलिओवर, एखाद्या मालमत्ता वर्गाच्या खराब कामगिरीचा होणारा प्रभाव कमी करू शकता.
विविध मालमत्ता वर्ग आर्थिक आणि बाजाराच्या परिस्थितीवर भिन्न प्रतिक्रिया देतात. त्यामुळे एकूण पोर्टफोलिओची जोखीम आणि परतावा संतुलित केला जातो. उदाहरणार्थ, जेव्हा बाजारात तेजी असेल, तेव्हा सोन्यात घसरण दिसून येईल, तर शेअरमध्ये मजबूत वाढ दिसून येईल. त्यामुळे पोर्टफोलिओतील घसरण रोखली जाईल.
म्युच्युअल फंडांमध्येदेखील शेअर बाजारातील गुंतवणुकीमुळे घेतली जाणारी थेट जोखीम टाळणे शक्य होते. त्यामुळे गुंतवणूक करताना आपल्याकडे असलेल्या निधीचे वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांमध्ये त्यातील जोखीम आणि आपली जोखीम क्षमता लक्षात घेऊन योग्य प्रमाणात विभाजन करणे आवश्यक आहे. म्युच्युअल फंडांमध्ये केलेली दीर्घकालीन गुंतवणूक चांगला परतावा देते.
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मल्टी-अॅसेट फंड
सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या म्युच्युअल फंडांपैकी एक म्हणजे आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मल्टी-अॅसेट फंड. एक, तीन, पाच आणि दहा वर्षांच्या आधारावर या फंडाने सर्वोच्च कामगिरी केली आहे. एखाद्या गुंतवणूकदाराने या योजनेच्या सुरुवातीला दहा लाख रुपये गुंतविले असते, तर त्या गुंतवणुकीचे आजचे मूल्य पाच कोटी ४८ लाख रुपये एवढे झाले असते. याचाच अर्थ, जेव्हा म्युच्युअल फंडांमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक केली जाते, तेव्हा त्याचा परतावा हा सर्वोत्तम असतो.
(लेखक कल्याणी कॅपिटल सर्व्हिसेस प्रा.लि.चे संचालक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.