‘टी + ०’च्या शिखरावरून...

फार पूर्वी म्हणजे १९९० च्या दशकात ‘ट्रेडिंग-रिंग’मध्ये ब्रोकरमार्फत विकलेल्या शेअरचे पैसे मिळण्यासाठी गुंतवणूकदारांना किमान महिनाभर वाट पाहावी लागायची.
T+0 Settlement
T+0 Settlementsakal

फार पूर्वी म्हणजे १९९० च्या दशकात ‘ट्रेडिंग-रिंग’मध्ये ब्रोकरमार्फत विकलेल्या शेअरचे पैसे मिळण्यासाठी गुंतवणूकदारांना किमान महिनाभर वाट पाहावी लागायची. त्यानंतर यामध्ये सुधारणा होऊन हा काळ कमी झाला आणि २००१, २००२, २००३, २०२२ मध्ये अनुक्रमे टी+५, टी+३, टी+२ आणि टी+१ सेटलमेंट सायकल सुरू झाली.

आता काही ठराविक ब्रोकरसाठी फक्त २५ शेअरसाठी चक्क ‘टी+०’ सेटलमेंट पद्धत सुरू होत आहे. हे जर सुरळीतपणे झाले, तर या महिन्यात २८ तारखेपासून ती पद्धत टप्प्याटप्प्याने इतर शेअरसाठी सुरू होईल आणि ही निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. चीन, रशिया, दक्षिण कोरिया, तैवान आणि हाँगकाँगमध्ये काही ठराविक शेअरसाठी ‘टी+०’ सेटलमेंट पद्धत आहे.

काय आहे ही ‘टी+०’ सेटलमेंट पद्धत आणि त्याचे गुंतवणूकदारांना काय फायदे आहेत, ते थोडक्यात पाहू या.

शेअर बाजारामध्ये खरेदी किंवा विक्री केलेल्या दिवसानंतर, ब्रोकर, बॅंका, डिपॉझिटरी-पार्टिसिपंट, क्लीअरिंग कॉर्पोरेशन आदींमार्फत किती काळामध्ये ‘पैसे’ अथवा ‘शेअर’ तुमच्या खात्यात येतात, त्या प्रक्रियेला ‘सेटलमेंट’ असे म्हणतात. ‘टी’ म्हणजे ‘ट्रेड’ अर्थात शेअर खरेदी किंवा विक्री ज्यादिवशी केली जाते तो दिवस. सध्याच्या नियमांप्रमाणे ‘सेटलमेंट’चा काळ एक दिवसाचा असल्याने, त्याला ‘टी+१’ असे म्हणतात. ‘ट्रेड’ (टी) या दिवसापासून एका दिवसात तुमच्या खात्यामध्ये पैसे अथवा शेअर मिळणे अपेक्षित आहे.

आता हाच काळ शून्य दिवसांचा होणार असल्याने ज्या दिवशी शेअर विकाल, त्याच दिवशी तुमच्या बँकखात्यात पैसे जमा होतील आणि ज्या दिवशी शेअर विकत घ्याल, त्याच दिवशी डी-मॅट खात्यात शेअर जमा होतील. सुरुवातीला ही प्रक्रिया वैकल्पिक असून, बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी दोन टप्प्यांमध्ये राबविली जाणार आहे.

पहिल्या टप्प्यामध्ये दुपारी १.३० वाजेपर्यंत जे व्यवहार होतील त्याचे पैसे अथवा शेअर त्याच दिवशी ४.३० वाजेपर्यंत खात्यात जमा होतील. दुसऱ्या टप्प्यामध्ये हीच वेळ ३.३० पर्यंत वाढवून त्यानंतर पहिला टप्पा बंद करण्यात येईल. सुरुवातीला बाजारमूल्यानुसार सर्वांत वरच्या ५०० शेअरसाठी ही प्रक्रिया सुरू केली जाईल. ही प्रक्रिया सुरळीत झाली, तर कालांतराने ती सर्व शेअरसाठी; तसेच सर्व गुंतवणूकदारांकरिता अनिवार्य केली जाण्याची शक्यता आहे.

काय आहेत फायदे?

1) शेअर विकल्यावर पैसे त्याच दिवशी बँकखात्यात आल्यामुळे गुंतवणूकदारांची ‘लिक्विडिटी’ अर्थात तरलता वाढेल. अर्थात शेअर बाजाराची तरलता वाढेल, जेव्हा ही ‘सेटलमेंट’ तत्काळ केली जाईल.

2) पैसे मिळण्याचा काळ कमी झाल्याने जोखीमसुद्धा कमी होईल.

3) सर्वसामान्य लोकांचा शेअर बाजारामधील सहभाग वाढण्यास मदत होईल.

4) आज समजा तुम्ही १००० शेअर १५० रुपयांना (लिमिट) विकत घ्यायचे ठरविले; परंतु भाव १५० रुपयांच्या वरच बंद झाला आणि तुम्हाला शेअर मिळाले नाहीत, तरीसुद्धा ब्रोकर तुमचे १,५०,००० रुपये अडवून (ब्लॉक) ठेवतो; जे तुम्हाला दुसऱ्या दिवशी वापरायला मिळतात. ‘टी+०’मुळे ते तुम्हाला त्याच दिवशी वापरायला मिळतील.

5) इक्विटी म्युच्युअल फंड योजना शेअर बाजाराशी निगडित असतात. त्यामुळे आज लगेच नाही; तरीही कालांतराने जेव्हा संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी तसेच सर्व शेअरसाठी ‘टी+०’ अनिवार्य होईल, तेव्हा इक्विटी म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनासुद्धा त्याचा फायदा होईल. ते जेव्हा पैसे काढतील तेव्हा त्यांच्या खात्यात पैसे एक दिवस लवकर जमा होतील.

तात्पर्य काय?

‘टी+०’ ही सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या दृष्टीने अतिशय चांगली पायरी आहे. या प्रक्रियेत आज आपण जवळजवळ शिखरावर पोहचलो आहोत. जेव्हा ‘टी+तत्काळ’ सेटलमेंट सुरू होईल, तेव्हा ती सर्वोच्च पातळी असेल. आपला शेअर बाजार आणि नियामक संस्था ‘सेबी’ अतिशय कार्यक्षम असून, येणाऱ्या नव्या काळानुसार योग्य ते बदल करण्यास सक्षम आहे, हेच ही प्रक्रिया सिद्ध करते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com