Vande Bharat Train : देशातील सर्वात वेगवान वंदे भारत ट्रेनशी जोडले टाटांचे नाव; काय आहे टाटांचा मेगाप्लॅन? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ratan Tata

Vande Bharat Train : देशातील सर्वात वेगवान वंदे भारत ट्रेनशी जोडले टाटांचे नाव; काय आहे टाटांचा मेगाप्लॅन?

Tata Steel To Manufacture Vande Bharat Train : वंदे भारत ट्रेन ही भारतीय रेल्वेची शान म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. वंदे भारत ट्रेनच्या सेवेचा विस्तार करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने एक मेगा प्लॅन तयार केला आहे.

ही योजना पूर्ण करण्यासाठी दिग्गज टाटा समूह आपले सहकार्य देईल. मिळालेल्या माहितीनुसार, टाटा स्टील आता वंदे भारत ट्रेन बनवणार आहे.

दोघांमध्ये एक करार झाला आहे, ज्या अंतर्गत, पुढील एका वर्षात टाटा स्टीलद्वारे 22 वंदे भारत गाड्या तयार केल्या जातील.

वंदे भारत ही देशातील सर्वात वेगवान ट्रेन आहे :

वंदे भारतला सेमी बुलेट ट्रेन देखील म्हणतात. ही स्वदेशी बनावटीची ट्रेन आहे जी पूर्णपणे भारतीय तंत्रज्ञानावर आधारित आहे. भारतीय रेल्वे पुढील दोन वर्षांत 200 वंदे भारत गाड्या तयार करण्याची योजना आखत आहे.

सध्या ती चेअर कार ट्रेन आहे. यात फक्त बसण्याची सोय आहे आणि जास्तीत जास्त 750 किमी अंतर व्यापते.

लांब पल्ल्याच्या मार्गांवर चालवण्याची रेल्वेची योजना असून, त्यासाठी स्लिपर असणे आवश्यक आहे. भारतीय रेल्वेने 2024 च्या पहिल्या तिमाहीत स्लिपर वंदे भारत ट्रेनचे लक्ष्य ठेवले आहे.

पुढील 2 वर्षात 200 वंदे भारत गाड्या बांधल्या जाणार :

वृत्तसंस्था IANS च्या वृत्तानुसार, रेल्वे मंत्रालयाने टाटा स्टीलसोबत पुढील दोन वर्षांत 200 वंदे भारत ट्रेनच्या बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी करार केला आहे.

टाटा स्टील भारतीय रेल्वेसाठी एलएचबी कोच (लिंक हॉफमन बुश कोच) देखील तयार करेल. कंपनी बोगीसाठी पॅनल, खिडकीची रचना तयार करेल.

22 वंदे भारत ट्रेनचे डबे तयार करणार :

एजन्सीच्या अहवालानुसार, रेल्वेने टाटा स्टीलला 145 कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे. कंपनी कोचसाठी वेगवेगळे भाग तयार करेल.

पुढील 12 महिन्यांत उत्पादनाचे काम पूर्ण होईल. टाटा स्टील 22 वंदे भारत ट्रेनसाठी आसन व्यवस्था तयार करेल. प्रत्येक ट्रेनमध्ये 16-16 डबे असतील.