ऑनलाइन कर्ज घेताना...

पारंपरिक पद्धतीपेक्षा अतिशय कमी वेळात ऑनलाइन कर्ज मिळते, त्यामुळे आजकाल ऑनलाइन कर्जाला वाढता प्रतिसाद मिळत आहे.
Online Loan
Online Loansakal

आर्थिक क्षेत्रातील डिजिटल व्यवहार आता नित्याची बाब झाली आहे. बहुतांश बँकिंग व्यवहार उदा. बँक खाते उघडणे, बँकेत ठेव ठेवणे, पैसे हस्तांतर करणे याबरोबरच आता कर्जसुद्धा डिजिटली घेता येऊ लागले आहे.

गृहकर्ज, वाहनकर्ज, शैक्षणिक कर्ज, शेअरतारण कर्ज, वैयक्तिक कर्ज अशा सर्व प्रकारची कर्जे बहुतेक सर्व खासगी बँका, सरकारी बँका, बिगरबँकिंग वित्तीय संस्था (एनबीएफसी) ऑनलाइन पद्धतीने देत आहेत. याशिवाय काही खासगी लोन अॅपसुद्धा यात कार्यरत आहेत.

पारंपरिक पद्धतीपेक्षा अतिशय कमी वेळात ऑनलाइन कर्ज मिळते, त्यामुळे आजकाल ऑनलाइन कर्जाला वाढता प्रतिसाद मिळत आहे. मात्र, असे झटपट कर्ज घेताना आवश्यक ती काळजी घेणे आवश्यक आहे. अनेकदा अशी खबरदारी घेतली जात नसल्याचे बऱ्याचदा दिसून येते. परिणामी, कर्जदाराचे नुकसान होते किंवा त्याची फसवणूक होते. हे टाळण्यासाठी पुढीलप्रमाणे काळजी घेणे गरजेचे आहे.

1) ऑनलाइन कर्ज घेण्यापूर्वी कर्जासाठीचा व्याजदर, प्रक्रिया शुल्क, अन्य चार्जेस याची माहिती घ्यावी. कर्जासाठी नेमका किती खर्च येणार आहे, हे समजून घ्यावे.

2) खासगी लोन अॅपमार्फत कर्ज घेत असल्यास संबंधित लोन प्लॅटफॉर्मची विश्वासार्हता तपासून पाहावी. अनेक बोगस प्लॅटफॉर्म कार्यरत असून, मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचे उघडकीस येत आहे. त्यामुळे अशा ॲपमार्फत कर्ज घेताना आवश्‍यक ती सर्व खबरदारी घ्यावी.

3) कर्ज मिळतेय तेवढे न घेता, आपल्याला आवश्यक तेवढेच कर्ज घ्या. गरजेपेक्षा जास्त कर्ज घेऊ नका.

4) ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर मिळणाऱ्या कर्जासाठी बहुदा व्याजाचा दर हा जास्त असतो, शिवाय काही छुपे चार्जेससुद्धा असतात, त्यामुळे कर्ज तत्काळ मिळत असले, तरी यासाठी येणारा एकूण खर्चसुद्धा नेहमीच्या कर्जापेक्षा जास्त असतो.

परिणामी, असे कर्ज फेडणे अवघड होऊन जाते. थकीत कर्जाच्या वसुलीसाठी साम, दाम, दंड पद्धत वापरली जाते.

5) अशा ऑनलाइन प्लॅटफॉर्मला आपण दिलेली माहिती सुरक्षित राहते, याची खात्री करून घ्या; अन्यथा आपल्या माहितीचा गैरवापर होऊ शकतो.

6) ऑनलाइन प्लॅटफॉर्मशी आपल्याला संपर्क कसा साधता येईल (उदा. ई-मेल, एसएमएस, फोन आदी) हे समजून घ्या. काही कारणामुळे कर्जाबाबत काही अडचण निर्माण झाली, तर यातून मार्ग काढता येणे शक्य झाले पाहिजे.

थोडक्यात, ऑनलाइन कर्जामुळे आपल्या तातडीच्या वेळी त्वरित कर्ज मिळत असले, तरी असे कर्ज योग्य ती खबरदारी घेऊनच घेणे हितावह असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com