

Financial Discipline
esakal
आजच्या वेगवान आणि तणावग्रस्त जीवनात आर्थिक शिस्त (Financial Discipline) आणि मानसिक आरोग्य (Mental Health) या दोन गोष्टी एकमेकांशी घट्टपणे जोडलेल्या आहेत. पैसा हा फक्त व्यवहाराचे माध्यम नाही, तर तो आपल्या सुरक्षिततेचा, आत्मविश्वासाचा आणि मानसिक स्थैर्याचाही आधार आहे. जेव्हा आर्थिक बाबी विस्कळित होतात, तेव्हा चिंता, नैराश्य आणि असुरक्षिततेची भावना वाढते. उलट, योग्य आर्थिक नियोजन आणि शिस्त पाळल्यास मन स्थिर, शांत राहते.
आपण सतत चिंता, भीती आणि तणावग्रस्त स्थितीत असू, तर आपले शरीरही त्याच्या खाणाखुणा दाखविण्यास सुरुवात करते. शारीरिक व्याधी जडू लागतात. सतत काहीतरी शारीरिक त्रास होऊ लागतात. यासाठी एक महत्त्वाचे कारण असते, ते म्हणजे आपली आर्थिक परिस्थिती. आपल्याला आपले आर्थिक भविष्य सुरक्षित आहे की नाही, याची काळजी असते किंवा उद्या माझी नोकरी गेली किंवा ती सोडणे भाग पडले तर घर कसे चालेल? एखादी दुर्घटना घडली किंवा आजारपण आले तर काय होईल? अशा चिंतांनी मन पोखरले जाऊ लागले, की शरीरही पोखरले जाऊ लागते. आपण आपल्या कुटुंबाचा खर्च चालवू शकत नसाल, तर अशा परिस्थितीमुळे आपल्या शरीरावर; तसेच आपल्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो, कारण आपली आर्थिक स्थिती आपल्या आत्मसन्मानाशी जोडलेली असते. तरुण वयात जिद्द असते, पैसा कमवायची उर्जा असते; पण ६०-६५ वर्षांनंतर शारीरिक क्षमता कमी होते. अशा वेळी आर्थिक कमाई करणे शक्य नसते. अशा वेळी पूर्वीपासून केलेले आर्थिक नियोजन मदतीला येते. या आर्थिक नियोजनामुळे आर्थिक सुरक्षेची खात्री असते. त्यामुळे मन समाधानी राहते आणि पर्यायाने शरीरही आरोग्यदायी राहते. यासाठी सर्वांत महत्त्वाची आहे आर्थिक शिस्त.