

वसंत कुलकर्णी - ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार
रिझर्व्ह बँकेच्या या आर्थिक वर्षातील पहिल्या पतधोरण आढावा बैठकीत मर्यादित चलनवाढ आणि आर्थिक वर्ष २०२५-२०२६ मध्ये अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर ६.५ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. रिझर्व्ह बँकेने पतधोरणात्मक दृष्टिकोनात बदल करत तो ‘तटस्थते’कडून ‘अनुकूल’ केला; तसेच पतधोरणात सर्वसंमतीने रेपोदरात पाव टक्का कपात करण्यात आली. रेपोदरातील कपात आणि धोरणात्मक दृष्टिकोनात बदल या दोन्ही निर्णयांची बाजाराला अपेक्षा होती. दुसरीकडे, अमेरिकेने आयातशुल्कात वाढ केल्यानंतर निर्माण झालेल्या आव्हानात्मक परिस्थितीत पाव टक्क्याची कपात दिलासा देणारी ठरेल.