
भूषण ओक - शेअर बाजार विश्लेषक
शक्ती पंप्स ही १९८२ मध्ये स्थापन झालेली कंपनी पंप, मोटर, इनव्हर्टर, कंट्रोलर, ‘व्हीएफडी’ (व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राइव्ह) आणि सोलर पंप यांचे उत्पादन करते. मध्य प्रदेशात पिठमपूर येथे कंपनीचा कारखाना असून वार्षिक पाच लाख पंपांपेक्षा जास्त उत्पादनाची कंपनीची क्षमता आहे. कंपनी तिच्या उत्पादनाचा सुमारे १८ टक्के हिस्सा जवळजवळ १२० देशांमध्ये निर्यात करते. अलीकडच्या काळात सौर ऊर्जेच्या उत्पादनावर आणि वापरावर सरकारचा भर आहे आणि त्यासाठी अनेक योजना केंद्र व राज्य सरकारांनी राबवल्या आहेत. केंद्राच्या पीएम कुसुम योजनेअंतर्गत १,२०,००० कोटी रुपये खर्चून ४९ लाख सोलर पंप बसवण्यात येणार आहेत. यात ६० टक्के सरकारी अनुदान असते. या कंपनीला या योजनांचा प्रचंड फायदा झाला आहे.