Patanjali Shares : कंपनीचे लाखो शेअर्स फ्रीज झाल्यानंतर रामदेव बाबा यांचे सूचक वक्तव्य, म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Patanjali Shares

Patanjali Shares : कंपनीचे लाखो शेअर्स फ्रीज झाल्यानंतर रामदेव बाबा यांचे सूचक वक्तव्य, म्हणाले...

Patanjali Foods FPO : योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली ग्रुपची एफएमसीजी कंपनी पतंजली फूड्स, फक्त एका वर्षाच्या आत आपला दुसरा एफपीओ म्हणजेच फॉलो ऑन ऑफर आणण्याच्या तयारीत आहे. याबद्दल बाबा रामदेव यांनी माहिती दिली आहे.

पतंजली फूड्सचे शेअर्स गोठवण्याच्या स्टॉक एक्सचेंजच्या निर्णयानंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे. पतंजली फूड्स एफपीओ आणून सार्वजनिक शेअरहोल्डिंग 25 टक्क्यांपर्यंत करेल. (Baba Ramdev says Patanjali Foods to launch another fpo after shares freezing by stock exchanges)

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत, बाबा रामदेव यांनी गुंतवणूकदार आणि भागधारकांना आश्वासन दिले की पतंजली फूड्स लिमिटेडच्या कामकाजावर, आर्थिक कामगिरीवर आणि वाढीवर कोणताही परिणाम होणार नाही.

ते म्हणाले की, गुंतवणूकदारांनी काळजी करण्याची गरज नाही. पतंजली फूड्स आपला दुसरा एफपीओ आणणार आहे.

ते म्हणाले की सेबीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, शेअर्स आधीच 8 एप्रिल 2023 पर्यंत लॉक-इन कालावधीत आहेत. या तारखेला लिस्टिंग झाल्यानंतर एक वर्षाचा कालावधी संपत आहे आणि स्टॉक एक्सचेंजच्या या निर्णयाचा पतंजली फूड्स लिमिटेडच्या कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही.

बाबा रामदेव म्हणाले की, पतंजली ग्रुप पतंजली फूड्स अतिशय चांगल्या पद्धतीने चालवत आहे. आणि ती व्यवसायाच्या विस्तार करणे, वितरण, नफा आणि कामगिरीची पूर्ण काळजी घेत आहे.

बाबा रामदेव म्हणाले की कंपनी FPO च्या माध्यमातून 6 टक्के स्टेक विकणार आहे. त्यांनी सांगितले की बाजारातील अस्थिर परिस्थितीमुळे एफपीओ आणायला उशीर झाला आहे. बाबा रामदेव यांनी सांगितले की, चालू आर्थिक वर्ष संपल्यानंतर कंपनी एफपीओची प्रक्रिया सुरू करेल.

पतंजली फूड्सने माहिती दिली आहे की स्टॉक एक्सचेंज BSE आणि NSE ने पतंजली आयुर्वेद आणि व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांच्यासह 21 प्रमोटर्स संस्थांचे शेअर्स गोठवले आहेत. स्टॉक एक्स्चेंजमधील सूचीबद्ध कंपन्यांसाठी किमान 25 टक्के सार्वजनिक शेअरहोल्डिंग असणे आवश्यक आहे. गेल्या वर्षी मार्च 2022 मध्ये पतंजली फूड्सने एफपीओ आणला होता.