LTIMindtree Ltd : एलटीआय माइंडट्री (शुक्रवारचा बंद भाव : रु. ५३०३)

‘लार्सन टुब्रो इन्फोटेक’ आणि ‘माईंडट्री’ या कंपन्यांच्या विलीनीकरणानंतर १४ नोव्हेंबर २०२२ रोजी ‘एलटीआय माइंडट्री’ ही कंपनी तयार झाली.
share market LTIMindtree Ltd Larsen Toubro Infotech and Mindtree share price analysis bhushan godbole
share market LTIMindtree Ltd Larsen Toubro Infotech and Mindtree share price analysis bhushan godbolesakal

‘लार्सन टुब्रो इन्फोटेक’ आणि ‘माईंडट्री’ या कंपन्यांच्या विलीनीकरणानंतर १४ नोव्हेंबर २०२२ रोजी ‘एलटीआय माइंडट्री’ ही कंपनी तयार झाली. विलीनीकरणामुळे आर्थिक वर्ष २०२३ मध्ये या नव्या कंपनीचा महसूल दुपटीने वाढून ३३,१८३ कोटी रुपये झाला.

त्यानंतर कंपनी कामकाजात चांगली वाढ दाखवत असून, आर्थिक वर्ष २०२४ मध्ये तिचा महसूल वाढून सुमारे ३६,००० कोटी होऊ शकतो. सध्या आयटी सेवा क्षेत्रातील ही सहाव्या क्रमांकाची सर्वांत मोठी कंपनी आहे.

जाहीर झालेल्या निकालानुसार, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा महसूल ८,७०२ कोटी झाला आहे. मागील आर्थिक वर्षांच्या अनुषंगाने १९ टक्के ऑपरेटिंग मार्जिनसह नफ्यामध्येदेखील वाढ झाली आहे.

कंपनीचा निव्वळ नफा १,१५२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. अंशतः ग्राहक त्याचप्रमाणे महसुलातील भौगोलिक एकाग्रता; तसेच भारतातील आयटी सेवा उद्योगातील तीव्र स्पर्धा ही या कंपनीसाठी जोखीम असली, तरी अनेक अडचणींचा सामना करावा लागत असूनदेखील कंपनी यशस्वीरित्या मार्गक्रमण करताना दिसत आहे.

उत्तम तरलता स्थिती, जवळपास कर्जमुक्त ताळेबंद, निरोगी नफा; तसेच ३० टक्क्यांपेक्षा जास्त कार्यरत भांडवलावर मिळणारा परतावा पाहता कंपनीची आर्थिक स्थिती मजबूत आहे. ‘लार्सन अँड टुब्रो’ या ब्रँडच्या ताकदीचाही कंपनीला फायदा होतो.

बँकिंग, वित्तीय सेवा, विमा क्षेत्रातील कंपन्या; तसेच रिटेल, मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील कंपन्यांना ही कंपनी ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट, क्लाउड कॉम्प्युटिंग, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन्स, मशीन लर्निंग आदी कार्यांसाठी आयटी सेवा प्रदान करते.

अलीकडच्या काही वर्षांत आयटी सेवा व्यवसाय हा ‘लार्सन अँड टुब्रो’ समूहासाठी अधिकाधिक महत्त्वाचा बनला आहे. पायाभूत सुविधा आणि भांडवल-केंद्रित विभागांवर लक्ष केंद्रित करण्याच्या पूर्वीच्या भूमिकेबरोबर, ‘एल अँड टी’ समूह आता सेवा व्यवसायावर लक्ष केंद्रित करताना दिसत आहे, ज्यामध्ये वित्तीय आणि आयटी सेवांचा समावेश आहे.

महसूल आणि नफा या दोन्हींबाबतीत सेवा व्यवसायाचे योगदान सुधारत आहे. या व्यतिरिक्त, ‘एल अँड टी’ समूह सेवा विभागाच्या क्षमतांचा फायदा घेऊन मूळ व्यवसायदेखील वाढवत आहे. ‘एल अँड टी’द्वारे २०१९ मध्ये ‘माईंड ट्री’चे अधिग्रहण, त्याच वर्षी ‘एल अँड टी नेक्स्ट’ नावाच्या धोरणात्मक उपक्रमाची सुरुवात;

तसेच ‘एल अँड टी इन्फोटेक’ आणि ‘माईंडट्री’ चे एकत्रीकरण कंपनीच्या धोरणात्मक वाटचालीच्या दृष्टीने चांगले संकेत देते. ‘एल अँड टी’ समूहाची कंपनी असल्याने, ‘एलटीआय माइंडट्री’ला समूहात उपलब्ध असलेल्या मजबूत ब्रँड आणि कार्यरत क्षेत्रातील कौशल्याचादेखील फायदा होतो, परिणामी बाजारात चांगला प्रवेश आणि स्वीकार्यता येते.

ट्रेझरी ऑपरेशन्सना ‘एल अँड टी’ ट्रेझरीद्वारे समर्थन दिले जाते आणि कोषागार समितीद्वारे महत्त्वाचे निर्णय घेतले जातात, ज्यात पालक कंपनी आणि ‘एलटीआय माइंडट्री’चे सदस्य असतात.

दीर्घावधीतील व्यवसायवृद्धीची शक्यता आणि क्षमता लक्षात घेता, गुंतवणूकदारांनी बाजारातील चढ-उतारांचा धोका लक्षात घेऊन दीर्घावधीच्या दृष्टीने संधी ओळखून या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा जरूर विचार करावा.

(या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

(लेखक ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com